मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धामोरा येथे शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर शाळेत खळबळल उडाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यात विद्यार्थी बाहेर पडताना दिसत आहे.
पोलिसांनी सांगितलं की, प्रिन्सिपल एस.के. सक्सेना यांनी बारावीचा विद्यार्थी सदम यादव याला 'बेटा, तू सुधर... बिघडू नको...' असं म्हटलं होतं. सदमला या साध्या गोष्टीचा खूप राग आला आणि त्याने आपलं पिस्तूल बाहेर काढलं. त्याने शाळेच्या बाथरूममध्ये जाऊन सक्सेना यांच्या डोक्यात गोळी झाडली. मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढलं. यामध्ये मुलगा स्पष्ट दिसत होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून असंच एक प्रकरण समोर आलं होतं, जिथे एका शाळेतील शिक्षकावर विद्यार्थ्याने हल्ला केला होता.
विद्यार्थ्याला मोबाईल वापरू नकोस असं सांगितल्यावर त्याने शिक्षकावर हल्ला केला होता. वर्गात मोबाईल वापरल्याबद्दल शिक्षकाने नववीच्या विद्यार्थ्याला खडसावलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्याने त्याच्या दोन साथीदारांसह शिक्षकावर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली. शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.