गर्लफ्रेंडसाठी 1100 Km प्रवास केला; महिन्याभरानंतर पोलिसांना तरुणाचा सांगाडा सापडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:38 IST2024-08-14T16:37:49+5:302024-08-14T16:38:07+5:30
त्या तरुणासोबत नेमकं काय घडलं, जाणून घ्या...

गर्लफ्रेंडसाठी 1100 Km प्रवास केला; महिन्याभरानंतर पोलिसांना तरुणाचा सांगाडा सापडला...
Crime News: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणाने आपल्या सोशल मीडियावरील गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी कॅब बुक केली आणि 1100 किलोमीटरचा प्रवास करुन मिदनापूर गाठले. तिथे पोहचताच तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पोलिसांना एका महिन्यानंतर त्या तरुणाचा सांगाडा सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा गजेंद्र चौधरी (18 वर्षे) याच्या वडिलांनी 8 ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात आपल्या मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. गजेंद्र चौधरी पश्चिम बंगालमध्ये गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. गजेंद्रच्या कुटुंबीयांनी कॅब चालक अनिकेत सोळंकीवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी अनिकेतची चौकशी केली असता, त्याने घडलेली संपूर्ण घटना सांगितली.
त्या दिवशी काय घडले?
कॅब चालकाने पोलिसांना सांगितले की, तो गजेंद्र चौधरीसोबत छिंदवाडा येथून पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात गेला होता. तिथे जाताच गजेंद्र त्याच्या सोशल मीडियावरील ग्रलफ्रेंडला भेटला. पण, तिच्या घरच्यांनी गजेंद्रला बेदम मारहाण केली आणि जखमी अवस्थेत माझ्या ताब्यात दिले. मी त्याच्याबरोबर निघालो, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घाबरुन मी गजेंद्रचा मृतदेह जंगलात फेकून दिला.
चालकाच्या कबुलीनंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांचे पथक पश्चिम बंगालला पोहोचले. चालक अनिकेतच्या सांगण्यावरुन मिदनापूर पोलिसांच्या मदतीने गजेंद्रच्या मृतदेहाचा जंगलात शोध घेतला असता त्याचा सांगाडा सापडला. जवळच पोलिसांना मृताचे बूट आणि घड्याळ सापडले. यावरुन गजेंद्रच्या कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली. आता याप्रकरणी तरुणीच्या घरच्यांवर कारवाई होणार आहे.