मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये एका चोराने केलेली चोरी ही त्याची शेवटची चोरी ठरली. चोर चोरीला गेलेली लोडिंग ऑटो घेऊन जात होता आणि अपघात झाला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात चोराची ओळख पटवली. तो भोपाळचा रहिवासी होता. कुटुंबातील सदस्य आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केलं जाणार आहे.
बुधवारी रात्री उशिरा, बैतुलच्या सरणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाठखेडा येथील संतोष कुमार नावाच्या व्यक्तीची लोडिंग ऑटो त्याच्या घरासमोर उभा होती. संधी पाहून एका चोराने ती चोरली. रात्री ३ वाजता ऑटो मालकाला कळालं की ऑटो चोरीला गेली आहे आणि भीषण अपघात झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. असं सांगितलं जात आहे की, पाथाखेडा आणि कालीमाई दरम्यान वेगाने जाणारी ही ऑटो अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि एका झाडावर आदळली आणि नंतर दुसऱ्या झाडावर आदळली. ऑटोचे दोन तुकडे झाले आणि ऑटो चालवणाऱ्या चोराचा जागीच मृत्यू झाला.
तपासादरम्यान, पोलिसांना चोराकडे अशी कोणतीही कागदपत्रं सापडली नाही ज्यामुळे त्याची ओळख पटू शकेल. घटनास्थळी एक मोबाईल सापडला आहे जो चोराचा असल्याचं मानलं जात आहे आणि या मोबाईलवरून त्याचं नाव रेहान उर्फ बिट्टू असून तो भोपाळचा रहिवासी असल्यायचं समोर आलं आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.