लुधियाना पोलिसांनी एका महिलेच्या हत्येचे गूढ उकललं आणि महिलेच्या पतीसह ६ आरोपींना अटक केली. या संदर्भात माहिती देताना पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, पती अमलोक मित्तल याने हा कट रचला होता. आरोपीच्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे.
आमच्या टीमने मोठ्या मेहनतीने हे गूढ उकललं आहे. आरोपीने त्याच्या पत्नीची अडीच लाख रुपयांची सुपारी दिली होती. ५० हजार आधीच दिले होते आणि आणखी २ लाख रुपये द्यायचे होते.
पतीने यापूर्वी दोनदा पत्नीला मारण्याचा प्लॅन केला होता. दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे ही हत्या करण्यात आली. पतीने सांगितलं की, त्याच्या पत्नीला त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल कळलं होतं आणि त्यानंतर तो तिला मारण्याचा कट रचत होता.
घटनेच्या रात्री आरोपीने सर्वप्रथम आपल्या पत्नीला शहरापासून दूर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी नेलं, तिला प्रेमाने जेवण भरवलं. नंतर तिथे जेवल्यानंतर त्याने पत्नीसोबत डीजेवर डान्स केला, ज्याचा त्याने व्हिडीओ देखील बनवला. परत येताना त्याने ही घटना घडवून आणली.
पती या संपूर्ण घटनेचा सूत्रधार होता. आरोपीची मैत्रीण घटनास्थळी त्याच्यासोबत नसली तरी, ती देखील कटात सहभागी होती. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे, अटक केलेल्या आरोपींपैकी काही सहनेवालचे तर काही धांधारीचे रहिवासी आहेत. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.