उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यातून हे सिद्ध झाले की वेळेत केलेली कारवाई एखाद्याचा जीव वाचवू शकते. येथे इन्स्टाग्रामवर आत्महत्येचा विचार व्यक्त करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत शोधून काढलं आणि त्याचा जीव वाचवला.
सआदतगंज परिसरात ही घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आपलं जीवन संपवण्याबाबत लिहिलं होतं. ही पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांच्या नजरेस पडली.
पोलिसांची सोशल मीडिया सेल सातत्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असते. याच दरम्यान टीमला ही संशयास्पद पोस्ट दिसली. पोस्टचं गांभीर्य ओळखून तातडीने याची माहिती सआदतगंज पोलीस ठाण्याला देण्यात आली. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळ न घालवता कारवाई सुरू केली.
माहिती मिळताच सआदतगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष कुमार आर्य यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं. पोलिसांनी तरुणाचं लोकेशन ट्रेस केलं आणि तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या पथकात ॲडिशनल इन्स्पेक्टर सहेंद्र कुमार, सब-इन्स्पेक्टर परविंदर सरोज आणि कॉन्स्टेबल राम भान व आशिष पाल यांचा समावेश होता. माहिती मिळाल्यापासून अवघ्या पाच मिनिटांत पथक तरुणापर्यंत पोहोचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तरुण मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आणि तणावात होता. तो आत्मघातकी पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत होता, मात्र पोलिसांच्या तत्परतेने त्याला वाचवलं. पथकाने तातडीने त्याला सुरक्षित स्थानी नेऊन त्याचे समुपदेशन सुरू केलं.
चौकशीत असं समोर आलं की, तरुणाचं त्याच्या पत्नीसोबत भांडण झालं होतं, ज्यामुळे तो अस्वस्थ होता. रागाच्या भरात त्याने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपलं दुःख व्यक्त केलं होतं, जी एक प्रकारे मदतीसाठी दिलेली हाकच होती.
पोलिसांनी केवळ तरुणाचा जीव वाचवला नाही, तर त्याला मानसिक आधारही दिला. अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढली, त्याच्या कुटुंबाशी बोलणं करून दिलं आणि परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणावर डीसीपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितलं की, तरुण आता सुरक्षित आहे. त्याने पुन्हा असं पाऊल न उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.
Web Summary : Lucknow police saved a 24-year-old man's life within five minutes after he posted suicidal thoughts on Instagram. Prompted by a domestic dispute, his post was quickly spotted by the social media cell, leading to immediate intervention and counseling by the police, preventing a tragedy.
Web Summary : लखनऊ पुलिस ने एक 24 वर्षीय व्यक्ति को इंस्टाग्राम पर आत्महत्या के विचार पोस्ट करने के पांच मिनट के भीतर उसकी जान बचाई। घरेलू विवाद के बाद, उसकी पोस्ट को सोशल मीडिया सेल ने तुरंत देखा, जिससे पुलिस द्वारा तत्काल हस्तक्षेप और परामर्श किया गया, जिससे एक त्रासदी टल गई।