प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:43 IST2025-08-01T11:42:39+5:302025-08-01T11:43:16+5:30
यूपीच्या बरेली येथे पूर्णागिरी दर्शन करून बुधवारी रात्री सासरहून बाईकवरून घरी जाणाऱ्या डेकोरेशन मालकाने पत्नीची प्लॅनिंग करून हत्या केली

प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
बरेली - लग्नात डेकोरेशनचं काम करता करता ओमसरनची ओळख बरेलीत राहणाऱ्या ब्यूटी पार्लरची मालक मन्नतशी झाली. मन्नतसोबत त्याने लव्ह मॅरेज केले होते. तिला घरी आणण्यासाठी अमरवतीला रस्त्यातून हटवणं गरजेचे होते. गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरूनच पत्नीची हत्या केली. आमच्या दोघींपैकी एकीची निवड कर असं प्रेयसी मन्नतने ओमसरनला सांगितले होते. त्यातून अमरवतीची हत्या करण्यात आली.
अमरवती हत्याकांडात पोलिसांनी प्रेमाचा त्रिकोण असल्याचं कारण समोर आणले. याबाबत आरोपी ओमसरने तपासात सांगितले की, कमी वयात माझं लग्न अमरवतीशी झालं होते. माझी मुलेही मोठी आहेत. अमरवती जुन्या विचारांची होती. ती कायम कुटुंबात आणि धार्मिक कार्यात व्यस्त असायची. माझे डेकोरेशनचं काम होते. त्यामुळे मी बऱ्याच लग्नांमध्ये महिलांच्या संपर्कात यायचो. एका लग्नात मन्नत आणि माझी ओळख झाली. मन्नत तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. जवळपास ६ महिने आमच्यात प्रेमसंबंध होते. त्यानंतर घरच्यांपासून लपून आम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केले असं त्याने सांगितले.
यानंतर ओमसरनने मन्नतला सोबत राहण्यास सांगितले तेव्हा मन्नतने एक अट ठेवली. जर तुझी पहिली पत्नी अमरवती आपल्या मार्गातून बाजूला होईल तेव्हाच हे शक्य आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून अमरवतीचा काटा काढण्याचं ठरवले. मन्नत भलेही या हत्येत सोबत नव्हती परंतु अमरवतीची हत्या करण्यासाठी मन्नतनेच ओमसरनला उकसावले असं तपासात पुढे आले आहे. पोलीस अमरवतीच्या हत्येचा तपास करत होती, तेव्हा ओमसरनच्या कॉल रेकॉर्डमुळे तो अडकला. संध्याकाळी ६ वाजता ते पूर्णागिरीहून निघाल्याचे मन्नतला सांगितले, त्यानंतर रात्री १०.३० वाजता बरेलीत पोहचले. तिथून ११ वाजता मोतीपुरा येथे दाखल झाले. ११.४५ वाजता दुचाकीवरून जोडपे निघाले तेव्हा मन्नतला अखेरचा कॉल केला. १२.१५ वाजता घटनास्थळी जोडपे पोहचले. तिथून १२.१५ ते १२.३० या काळात हत्या करण्यात आली. त्यानंतर १२.३५ वाजता एकाने पोलिसांना कॉल करून हत्येची माहिती दिली.
नेमकं काय घडले?
यूपीच्या बरेली येथे पूर्णागिरी दर्शन करून बुधवारी रात्री सासरहून बाईकवरून घरी जाणाऱ्या डेकोरेशन मालकाने पत्नीची प्लॅनिंग करून हत्या केली. ही हत्या लूटमारीतून झाल्याचा बनाव रचण्यात आला. त्यानंतर १५ तासांनी या घटनेचं खरे कारण उघड केले. प्रेयसीसोबत एकत्र राहण्यासाठी पहिल्या पत्नीची हत्या करण्याच्या हेतूने ही हत्या झाली. या घटनेतील आरोपीला शुक्रवारी जेलला पाठवले आहे. घटनास्थळी जेव्हा पोलीस पोहचले तेव्हा ओमसरनचे कपडे फाटले होते. गळ्यावर आणि पाठीवर मारहाणीच्या खूना होत्या. पत्नीचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. सुरुवातीला अज्ञात लोकांनी चोरीच्या हेतूने ही हत्या केली असा अंदाज वर्तवण्यात आला. परंतु तपास सुरू केला असता त्यातील पडद्यामागचा चेहरा समोर आला.