गोव्यात 35 टक्के खून प्रकरणांत प्रेमाचाच अँगल; गेल्या सहा महिन्यात 15 खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:12 PM2020-06-22T23:12:40+5:302020-06-22T23:17:46+5:30

खून प्रकरणाशी प्रेमाचा संबंध हा गुन्हेगारी विश्वातला नेहमीचा प्रकार असून या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात गोव्यात एकूण 15 खून प्रकरणे घडली असून त्यातील 5 प्रकरणाशी या-ना- त्या कारणाने प्रेम प्रकरण आणि शारीरिक संबंध याचा संबंध असल्याचे दिसून आले आहे.

Love angle in 35 % murder cases in Goa | गोव्यात 35 टक्के खून प्रकरणांत प्रेमाचाच अँगल; गेल्या सहा महिन्यात 15 खून

गोव्यात 35 टक्के खून प्रकरणांत प्रेमाचाच अँगल; गेल्या सहा महिन्यात 15 खून

Next
ठळक मुद्देगँगवॉर सारखी प्रकरणे प्रेमाच्या कारणासाठी झाली तरी त्यामागे आपल्या टोळीचे वर्चस्व दाखविणे हा त्यामागचा खरा हेतू असतो.

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: सांताक्रूझ येथे झालेल्या गँगवॉर प्रकरणात आता प्रेमाचा अँगलही पुढे आलेला असून या दोन टोळीतील दोघेजण एकाच मुलीवर प्रेम करत होते. यातूनच ही गोळीबाराची घटना घडली, त्यात सोनू यादव या गुंडगिरी प्रवृत्तीच्या एका इसमाचा खून झाला.

खून प्रकरणाशी प्रेमाचा संबंध हा गुन्हेगारी विश्वातला नेहमीचा प्रकार असून या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात गोव्यात एकूण 15 खून प्रकरणे घडली असून त्यातील 5 प्रकरणाशी या-ना- त्या कारणाने प्रेम प्रकरण आणि शारीरिक संबंध याचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण 35 टक्के असून राज्यात सहा महिन्यात खुनी हल्ला करण्याच्या 7 घटना घडल्या असून त्यातील 2 घटनाही अशा कारणाशी निगडित आहेत.

यंदा फेब्रुवारी महिन्यात अशा दोन खुनाच्या घटना घडल्या. 10 फेब्रुवारी रोजी पर्वरी येथील निर्जनस्थळी एक 35 वर्षीय महिलेचा मृतदेह एका चिऱ्याच्या खाणीत सापडला होता. या महिलेवर प्रथम बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात नंतर पोलिसांनी रूपींदर नाईक या उडिशाच्या कामगाराला अटक करण्यात आली होती. त्यावेळीही हाच कोन पुढे आला होता.

28 फेब्रुवारी रोजी कुळण साखळी येथे नदीत एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेचा गळा साडीने आवळून खून करण्यात आला होता. नंतर ही आत्महत्या असे भासविण्यासाठी तिचा मृतदेह पाण्यात टाकून देण्यात आला होता. या प्रकरणात नंतर आरोपीला अटक केली असता हाच अँगल पुढे आला होता.

महिलांच्या हक्कासाठी वावरणाऱ्या  बायलांचो एकवट या संघटनेच्या अध्यक्ष  आवदा व्हिएगस या संबंधी बोलताना म्हणाल्या,  पुरुषी अहंकारातून या गोष्टी वाढत असून पुरुषांना महिला या आपल्या वापरायच्या वस्तू असे वाटत असल्यानेच हे प्रकार घडतात . व्हिएगस यांच्या म्हणण्याला पुस्ती देणाऱ्या दोन घटना एप्रिल महिन्यात घडल्या. आपल्या प्रेयसीने आपले प्रेम अव्हेरल्याने प्रेयसीचा खून करण्याच्या दोन घटना घडल्या आणि त्याही गोव्यात लॉकडाऊन चालू असताना.

17 एप्रिल रोजी बायथेखोल बोरी येथे मन्सूर शेख याने आपल्या 17 वर्षीय प्रेयसीचा गळा दाबून खून केला. तर 25 एप्रिल रोजी बाणावली येथे मेलबर्न रोद्रीगिस यानेही अशाच प्रकारे आपल्या प्रेयसीला निर्जनस्थळी गळा दाबून खून केला. पहिल्या प्रकणात त्या मुलीने आरोपीच्या प्रेमाला नकार दिला होता तर दुसऱ्या प्रकारनात आरोपी कामधंदा सोडून बेकार झाल्याने मुलीने त्याच्याबरोबर संबंध ठेवण्यास नकार दिला होता.

एप्रिल महिन्यातच अशा प्रकारची आणखी एक घटना कुंकळी येथे घडली होती. चारित्र्याचा संशय घेऊन एका पतीने आपल्या पत्नीवर गोळी झाडली होती. पण तिचे दैव बलवत्तर असल्याने ती तिच्या खांद्याला चाटून गेल्याने तिचा जीव वाचला तर मार्च महिन्यात नेसाय येथून एका शाळकरी मुलीचे अपहरण करून केपे येथील जंगलात तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. आपला हा प्रकार कुणाला कळू नये यासाठी तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न झाला पण देवाच्या कृपेने तीही वाचली होती.

या अशा प्रकाराबद्दल एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने विश्लेषण करताना सांगितले. प्रेमाच्या अँगलमधून खून होतात ही गोष्ट जरी खरी असली तरी हे खून करण्यामागे आणखीही कारणे असतात. गँगवॉर सारखी प्रकरणे प्रेमाच्या कारणासाठी झाली तरी त्यामागे आपल्या टोळीचे वर्चस्व दाखविणे हा त्यामागचा खरा हेतू असतो.

Web Title: Love angle in 35 % murder cases in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.