बघ, गाडीवर मी काय लिहिले, म्हणत मुलीची काढली छेड; नळावर पाणी भरत होती
By प्रदीप भाकरे | Updated: August 20, 2023 13:32 IST2023-08-20T13:31:31+5:302023-08-20T13:32:02+5:30
१९ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास ती पाण्याच्या टाकीजवळील नळावर पाणी भरण्याकरीता गेली

बघ, गाडीवर मी काय लिहिले, म्हणत मुलीची काढली छेड; नळावर पाणी भरत होती
अमरावती: नळावर घडा घेऊन पाणी भरत असलेल्या अल्पवयीन मुलीसमोर येत बघ, गाडीवर मी काय लिहिले, असे म्हणत तिची सार्वजनिक ठिकाणी छेड काढण्यात आली. वरूड तालुक्यातील एका गावात १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी आरोपी आकाश रवी वानरे (२५, तिवसा घाट, वरूड) याच्याविरूध्द विनयभंग व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास एक १६ वर्षीय मुलगी गुंड घेवून नळावरून पाणी आणण्याकरीता गेली होती. ती नळावर पाणी भरत असतांना आकाश वानरे हा तिच्याजवळ येवून थांबला. तथा तिची छेड काढत ‘मला तुला भेटायचे आहे’, असे म्हणून तिला खेचले. तेव्हा कसाबसा हात सोडवून तिने पाण्याचा घडा घेऊन घर गाठले. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या त्या प्रकारामुळे ती नखशिखांत हादरली. त्यामुळे चार दिवस ती घराबाहेर पडली नाही.
दरम्यान १९ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास ती पाण्याच्या टाकीजवळील नळावर पाणी भरण्याकरीता गेली असता आकाश वानरे याने तिच्याजवळ येत दुचाकी थांबविली. ‘माझ्या गाडीवर पाहा मी काय लिहिले आहे, असे तो बरळला. त्यामुळे ती भितीने पाण्याचा गुंड घेऊन घरी पळून गेली. विशेष म्हणजे तिच्या काकासमक्ष तो प्रकार घडला. चार दिवसांच्या अंतराने त्याने सलग दोनदा छेड काढल्याने ती भयभित झाली. त्यामुळे तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. याप्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.