लॉकडाऊनमुळे ओढवली बेरोजगारी, पोटाची भूक भागवण्यासाठी तरुणाने लोकलमध्ये केली 120 रुपयांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 20:09 IST2021-07-11T20:08:33+5:302021-07-11T20:09:57+5:30
Crime News: धावत्या लोकल ट्रेन मध्ये चढून एका तरुणाने एका प्रवाश्याच्या गळ्याला ब्लेडचा धाक दाखवून चक्क त्याकडील 120 रुपये चोरून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

लॉकडाऊनमुळे ओढवली बेरोजगारी, पोटाची भूक भागवण्यासाठी तरुणाने लोकलमध्ये केली 120 रुपयांची चोरी
- आशिष राणे
वसई - वसई रोड ते नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या लोकल ट्रेन मध्ये चढून एका तरुणाने एका प्रवाश्याच्या गळ्याला ब्लेडचा धाक दाखवून चक्क त्याकडील 120 रुपये चोरून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित रेल्वे प्रवाशी राजू बिर्जे यांच्या फिर्यादीवरून वसई रोड रेल्वे लोहमार्ग पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे तपास करून आरोपी अरबाज खान वय (18) याला अटक केली आहे. (Lockdown leads to unemployment, youth steals Rs 120 from local to satisfy hunger)
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 4 जुलै रोजी नालासोपारा ते वसई रोड रेल्वे स्थानक दरम्यान फिर्यादी राजू बिर्जे हे प्रवाशी रात्री 9.15 च्या सुमारास लोकलने प्रवास करताना धावत्या लोकल मध्ये आरोपी चढून राजू यांच्या गळ्याला ब्लेड लावुन धमकावले आणि त्याच्याकडून 120 रुपये चोरून वसई रोड रेल्वे स्थानकात ट्रेन येताच आरोपीने उडी मारून पळ काढला. दरम्यान घडल्या प्रकाराची फिर्याद पीडित प्रवाशी राजू बिर्जे यांनी वसई रोड लोहमार्ग पोलिसांना दिली असता रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध भा.दंड संहिता कलम 392 अनव्ये जबरी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला.
रेल्वे पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतल्यावर त्याची पीडित प्रवाशाकडून ओळ्ख पटवून घेतली तसेच त्या आरोपीची कुठलीही यापूर्वीची गुन्ह्यांची पार्श्वभूमी नसल्याचे ही तपासात निष्पन्न झाले.
परिणामी या जबरी चोरीच्या गुन्ह्यांविषयी आरोपी याला विचारले असता आपण आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली रेल्वे पोलिसांना दिली आहे, मात्र वसईत लोकल ट्रेन मध्ये घडलेल्या प्रकाराने एकार्थाने लॉकडाऊन काळातील बेरोजगारीने तरुणाईची गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल जातेय की काय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.