वकील विश्वांग देसाईचा १७ कोटी ९० लाखांच्या बनावट चित्रांच्या विक्रीत सहभाग, ईडीकडून तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 07:36 AM2024-03-19T07:36:17+5:302024-03-19T07:36:52+5:30

ईडीच्या प्राथमिक तपासात अनेकांची फसवणूक

Lawyer Vishwang Desai's involvement in sale of fake paintings worth Rs 17.9 crore, probe by ED | वकील विश्वांग देसाईचा १७ कोटी ९० लाखांच्या बनावट चित्रांच्या विक्रीत सहभाग, ईडीकडून तपास

वकील विश्वांग देसाईचा १७ कोटी ९० लाखांच्या बनावट चित्रांच्या विक्रीत सहभाग, ईडीकडून तपास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील एका इन्व्हेस्टमेंट बँकरला बनावट चित्रे विकत तब्बल १७ कोटी ९० लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणात मुंबईतील वकील विश्वांग देसाई याचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली असून हा वकील आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. 

विश्वांग देसाई व राजेश राजपाल यांनी कटकारस्थान करून संबंधित व्यापाऱ्याला गंडा घातल्याची ईडीला माहिती मिळाली आहे. या दोघांनी आणखी किती जणांना गंडा घातला आहे याचा आता अधिक तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.

एम. एफ. हुसेन, एन. एस. बेन्द्रे, राम कुमार या आणि अशा दिग्गज चित्रकारांच्या चित्रांची बनावट नक्कल तयार करून विश्वांग देसाई, राजेश राजपाल व त्यांच्या साथीदारांनी त्याची विक्री लोकांना केली आहे. पुनीत भाटिया या इन्व्हेस्टमेंट बँकरला या दोघांनी १७ कोटी ९० लाख रुपयांना एका चित्राची विक्री केली. हे चित्र एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याकडे होते व त्याला या दुर्मीळ चित्राची विक्री करायची असल्याचे सांगत हे चित्र देसाई व राजपाल यांनी भाटिया यांना विकले, तसेच ते चित्र खरे असल्याचे प्रमाणपत्रही भाटिया यांना दिले. मात्र, काही दिवसांनी संबंधित निवृत्त सनदी अधिकारी व भाटिया यांची भेट झाली त्यावेळी भाटिया यांनी त्या चित्राबद्दल विचारणा केली असता असे कोणेतही चित्र आपल्याकडे नसल्याचे संबंधित निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सांगितले. तेव्हा विश्वांग देसाई व राजपाल यांनी आपली फसवणूक केल्याचे भाटिया यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुंबईत ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

ईडीच्या प्राथमिक तपासात अनेकांची फसवणूक

केवळ एकच चित्र नव्हे तर अनेक जणांची फसवणूक अशा पद्धतीने झाली असून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. १३ मार्च रोजी ईडीने मुंबईत सहा ठिकाणी छापेमारी केली व या छापेमारीदरम्यान बनावट चित्रांच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, चित्र खरी असल्याची प्रमाणपत्रे डिजिटल उपकरणे व त्यात साठवलेले काही पुरावे अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.

Web Title: Lawyer Vishwang Desai's involvement in sale of fake paintings worth Rs 17.9 crore, probe by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.