लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:54 IST2025-11-18T18:54:15+5:302025-11-18T18:54:37+5:30
अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे.

लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार...
संघटित गुन्हेगारीविरोधात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. मुंबईतील दोन अत्यंत हाय-प्रोफाइल गुन्हे – दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या प्रकरणांमध्ये अनमोल बिश्नोई मुख्य आरोपी आहे.
अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. उद्या त्याला दिल्लीला पाठविले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात डिपोर्ट केल्याची माहिती आता अधिकृतपणे समोर आली आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने याबाबतची माहिती दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जीशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे दिली आहे. जीशान सिद्दीकी यांनी या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला असून, त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, अनमोल बिश्नोईला आज, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अमेरिकेतून भारतात डिपोर्ट करण्यात आले आहे.
या माहितीमुळे अनमोल बिश्नोईच्या भारतात परतण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, आता मुंबई पोलीस आणि इतर तपास यंत्रणांकडून त्याला त्वरित ताब्यात घेऊन सिद्दीकी हत्या आणि सलमान खान हल्ल्याच्या प्रकरणांमध्ये कसून चौकशी केली जाईल.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
मुंबईतील राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये अनमोल बिश्नोईचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या हत्येमागील संपूर्ण सूत्रधार आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कची माहिती त्याच्या अटकेमुळे मिळू शकणार आहे.
तसेच अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराच्या कटातही अनमोल बिश्नोईचा सहभाग असल्याचे मानले जाते. या हल्ल्याची संपूर्ण योजना त्यानेच परदेशातून आखली होती. सुरक्षा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनमोल बिश्नोईला लवकरच भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात दिले जाईल. त्याच्या चौकशीतून या दोन्ही मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाला नवी दिशा मिळणार असून, देशातील संघटित गुन्हेगारीचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.