"सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:05 IST2025-10-22T11:04:04+5:302025-10-22T11:05:01+5:30
लॉरेन्स बिश्नोई गँग आणि रोहित गोदारा हे सोशल मीडियावर एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.

"सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात बनवारी गोदारा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. फ्रेस्नो काउंटी शेरिफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनवारी मूळचा सॅन होजेचा रहिवासी होता आणि अलीकडेच फ्रेस्नोमध्ये राहत होता. नॉर्थवेस्ट फ्रेस्नोमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये दोन जणांवर गोळीबार झाला. या घटनेनंतर, लॉरेन्स बिश्नोई गँग आणि रोहित गोदारा हे सोशल मीडियावर एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.
लॉरेन्सचा भाऊ, आरजू बिश्नोई आणि कुख्यात गँग सदस्य हॅरी बॉक्सरने रोहित गोदाराला "गद्दार" असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. आरजू बिश्नोई आणि हॅरी बॉक्सर दोघेही अमेरिकेत लपून बसले आहेत. रोहित गोदाराने सोशल मीडियावर पोस्ट करून दावा केला आहे की, त्यानेच हा हल्ला घडवून आणला होता आणि त्याचं टार्गेट लॉरेन्स गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर होता, जो गोळीबाराच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता.
गोदाराने लॉरेन्स बिश्नोईवरही निशाणा साधला आणि बॉक्सरला भित्रा म्हटलं. यानंतर हॅरी बॉक्सरने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. बॉक्सरने सांगितलं की, तो घटनेच्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि तो कधीही त्या शहरात गेला नव्हता. त्याने आरोप केला की रोहित गोदाराच्या गँगने एका गरीब, निष्पाप मुलाला मारलं. बॉक्सर म्हणाला, "हा गद्दार माझ्या आणि लॉरेन्स भाईच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवू इच्छितो. त्यांना आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात पिढ्या लागतील..."
"रोहित गोदारा हा एक लपलेला उंदीर आहे. तुला मारण्यासाठी मला शस्त्राची गरज नाही. मी तुला माझ्या स्वतःच्या हातांनी मारेन. एकदा तू लोकेशन सांग म्हणजे तुला समजेल. रोहित गोदारा हा सर्वात मोठा गद्दार आहे - त्याच्या नावातच गद्दारी आहे. त्याची खरी ओळख तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आम्हाला माहिती आहे - तो आमच्या समोर काहीच नाही."
आरजूने स्पष्टपणे इशारा दिला की, रोहित गोदाराला लवकरच प्रत्युत्तर दिलं जाईल. तो वारंवार लॉरेन्सचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या लोकांनी हे सुरू केलं आणि आम्ही ते संपवू. आम्ही त्यांना पोस्टने नाही तर गोळ्यांनी उत्तर देऊ." गेल्या अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँग आणि रोहित गोदारा यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे.