दिल्लीतील जिम मालक नादिर शाह याच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने साबरमती जेलमध्ये बसून नादिर शाहच्या हत्येचा कट रचला होता. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
१२ डिसेंबर रोजी पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. लॉरेन्स बिश्नोई, हाशिम बाबा, रणदीप मलिक यांच्यासह १४ आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लॉरेन्सने साबरमती जेलमधून व्हिडीओ कॉल केला होता आणि तिहार जेलमध्ये बंद गँगस्टर हाशिम बाबाशी बोलला होता. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हाशिम बाबाने मोठा खुलासा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स साबरमती जेलमधून व्हिडीओ कॉल करून तिहार जेलमध्ये असलेल्या गँगस्टर हाशिम बाबाशी बोलल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हाशिम बाबाने हा खुलासा केला आहे. हाशिमने सांगितलं की, लॉरेन्सने त्याला व्हिडीओ कॉल करून दोन फोनही दाखवले होते. नादिरच्या हत्येचे आदेश दिले होते आणि शूटर्सचा बंदोबस्त करण्यास सांगितलं होतं.
या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या पथकाने साबरमती जेलमध्ये जाऊन लॉरेन्सची चौकशीही केली होती. आरोपपत्रात हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसून, वेगवेगळ्या टोळ्यांमधील परस्पर वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत बसून रणदीप मलिक याने हत्येसाठी शस्त्र पाठवली होती.
१३ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पॉश ग्रेटर भागात ३५ वर्षीय नादिर शाहची हत्या करण्यात आली होती. नादिर त्याच्या जिमच्या बाहेर उभा होता तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर पोलिसांनी गँगस्टर हाशिम बाबाला अटक केली. अटकेनंतर हाशिम बाबाने चौकशीत अनेक खुलासे केले आहेत.