ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई
By मनोज गडनीस | Updated: February 12, 2024 18:09 IST2024-02-12T18:08:10+5:302024-02-12T18:09:14+5:30
घर खरेदीदारांच्या फसवणुकीचे प्रकरण

ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई
मनोज गडनीस, मुंबई: नवी मुंबईमधील तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात सर्वसामान्य लोकांची फसवूणक केल्याप्रकरणी विकासक ललित टेकचंदानी याच्याशी संबंधित २२ ठिकाणी ईडीने ७ फेब्रुवारी रोजी छापेमारी करत त्याची ३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तमध्ये बँक खात्यात असलेली रक्कम, मुदत ठेवी तसेच रोख रकमेचा समावेश आहे. मुंबई व नवी मुंबई येथे ही छापेमारी करण्यात आली होती.
प्राप्त माहितीनुसार, ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते. या प्रकल्पात घरे घेऊ इच्छिणाऱ्या १७०० लोकांकडून एकूण ४०० कोटी रुपये जमा केले होते. मात्र या प्रकल्पाला बराच विलंब झाला. तसेच टेकचंदानी याने लोकांना पैसेही परत केले नाही. याउलट या सर्वसामान्य लोकांकडून जमा केलेल्या रकमेचा अपहार करत ती वैयक्तिक लाभासाठी वापरल्याचा ठपका ईडीने त्याच्यावर ठेवला आहे. या प्रकल्पात घराचे बुकिंग करत लाखो रुपये गुंतवलेल्या चेंबूर येथील एका रहिवाशाने टेकचंदानी याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी टेकचंदानी याची नऊ तास चौकशी केली व त्यानंतर त्याला अटक केली.