'मी माझ्या आईकडे जातेय...', असं म्हणत तिनं पायाची नस कापली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 19:54 IST2022-01-31T19:53:42+5:302022-01-31T19:54:11+5:30
दिल्लीत लंडनहून आलेल्या एका महिला डॉक्टरनं आपल्या पायाची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

'मी माझ्या आईकडे जातेय...', असं म्हणत तिनं पायाची नस कापली अन्...
नवी दिल्ली-
दिल्लीत लंडनहून आलेल्या एका महिला डॉक्टरनं आपल्या पायाची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दक्षिण दिल्लीच्या मस्जिद मोठ परिसरातील ही घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरचं नाव नेघा कायल असं आहे. ४० वर्षीय मेघा लंडनच्या मिल्टन कीन्स युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार मेघा गेल्या वर्षी आपल्या आईच्या वैद्यकीय उपचारासाठी भारतात आल्या होत्या. पण २७ जानेवारी रोजी मेघा यांच्या ७९ वर्षीय आईचं दीर्घ आजारानं निधन झालं होतं. त्यानंतर मेघा या प्रचंड मानसिक तणावात होत्या. मेघा यांनी ३० जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरी सर्जिकल ब्लेडनं आपल्या पायाची नस कापली. यानंतर तातडीनं त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
कुटुंबीयांनी डुप्लीकेट चावीनं उघडला दरवाजा अन्...
पोलिसांनी जेव्हा चौकशीला सुरुवात केली तेव्हा कळालं की, ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मेघा यांच्या कुटुंबीयांनी जेव्हा मेघा याच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली तेव्हा त्या कोणताही प्रतिसाद देत नव्हत्या. बराच वेळ दरवाजा न उघडल्यानं कुटुंबीयांना शंका आली आणि त्यांनी डुप्लीकेट चावीनं दरवाजा उघडला. खोलीत प्रवेश करताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मेघा या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. कुटुंबीयांनी तातडीनं मेघा यांना रुग्णालयात दाखल केलं. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांना सापडली 'सुसाइड नोट'
घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. "आईच्या निधनानंतर मी खूप तणावात आहे. त्यामुळे मीही आता आईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही", असं सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्याचं आढळून आलं आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील चौकशी केली जात आहे.