कोलकात्याचा ब्लॅकमेलर गोव्यात जेरबंद : फेसबुक फ्रेण्डचे शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 23:32 IST2019-11-21T23:27:06+5:302019-11-21T23:32:03+5:30
फेसबुकवर फ्रेण्डशिप झाल्यानंतर विद्यार्थिनीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या आणि नंतर या संबंधाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीकडून चार लाख रुपये हडपणाऱ्या नराधमाला अखेर अंबाझरी पोलिसांनी शोधून काढले.

कोलकात्याचा ब्लॅकमेलर गोव्यात जेरबंद : फेसबुक फ्रेण्डचे शोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेसबुकवर फ्रेण्डशिप झाल्यानंतर विद्यार्थिनीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या आणि नंतर या संबंधाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीकडून चार लाख रुपये हडपणाऱ्या नराधमाला अखेर अंबाझरी पोलिसांनी शोधून काढले. तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी गोव्यात दडून बसला होता. पोलिसांनी त्याच्या तेथे जाऊन मुसक्या बांधल्या.
सौरभ विश्वनाथ मंडल (वय २४) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा टिटागड, कोलकाता येथील रहिवासी होय. तक्रार करणारी विद्यार्थिनी मूळची नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहायची. आरोपी सौरभ मंडल सोबत तिची ११ जुलै २०१३ ला फेसबुकवरून ओळख आणि नंतर फ्रेण्डशिप झाली. त्यानंतर हे दोघे निरंतर ऑनलाईन संपर्कात राहू लागले. स्वत: कॉर्पोरेट कंपनीत अधिकारी आहो, असे सांगून विद्यार्थिनीला आरोपी सौरभने चांगल्या जॉबची ऑफर दिली. त्यामुळे ती त्याच्या चांगलीच जवळ गेली. आरोपी नागपुरात आला. प्रारंभी एलआयटी कॉलेज, अमरावती मार्ग परिसरात आणि नंतर रामदासपेठेतील हॉटेल चिदंबरा तसेच कोलकाता येथे नेऊन त्याने तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित तयार केली. एवढेच नव्हे तर तरुणीचे विवस्त्रावस्थेत फोटोही काढले. ती चित्रफित आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला मोठ्या रकमेची मागणी करू लागला. तरुणीच्या घरची स्थिती चांगली असल्यामुळे आणि ती शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहत असल्याने तिला तिचे पालक महिन्याला मोठी रक्कम पाठवित होते. तीन वर्षांत तरुणीने तब्बल चार लाख रुपये आरोपी सौरभला दिले.
अखेर नोंदवली तक्रार
तरुणीकडून रक्कम मिळत असल्यामुळे ती आणखी मोठ्या स्वरूपात मिळावी म्हणून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तर, आता आपण अधिक रक्कम देऊ शकत नाही, असे सांगूनही आरोपी सौरभ ऐकत नसल्याचे पाहून तरुणी त्याला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा देत होती. ते पाहून आरोपीने तिला बदनाम करण्यासाठी तिच्या नावाने परस्पर दुसरा जी-मेल आणि फेसबुक आयडी तयार केला आणि त्यावर तिचे विवस्त्रावस्थेतील फोटो अपलोड करण्याची धमकी देऊ लागला. तरुणीने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. तीने धीर दिल्यानंतर आईवडिलांना सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०१६ ला अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची कुणकुण लागताच आरोपीने आपले सर्व संपर्क क्रमांक बंद केले.
अखेर छडा लागला
आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन वर्षांत अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्याचा छडा लागत नव्हता. अखेर काही दिवसांपूर्वी त्याने नवीन मोबाईल नंबर घेतल्याचे पोलिसांना कळले. त्याआधारे त्याचे लोकेशन काढून अंबाझरीचे पोलीस पथक बारडेज, नार्थ गोवा खुरुसावाडा येथे पोहचले. तेथून त्यांनी आरोपी सौरभला अटक करून नागपुरात आणले. न्यायालयाने त्याचा २४ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मंजूर केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरीचे ठाणेदार विजय करे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.