पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवित चाकूने केले वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:44 IST2019-03-16T16:43:19+5:302019-03-16T16:44:53+5:30
पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी हैदर सय्यद यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवित रॅम्बो चाकूने पायावर वार करुन त्यांना जखमी केले.

पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवित चाकूने केले वार
पिंपरी : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवित चाकूने वार केल्याप्रकरणी सहा ते सात जणांच्या टोळक्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील हॉटेल चुलामध्ये गुरुवारी(दि.१४ मार्च) रात्री अकराच्या सुमारास घडली. अतुल उर्फ चांड्या पवार, सनी परदेशी, राहुल उर्फ दगड्या टोणपे (सर्व रा. व्हि.६ बिल्डिंग, डिलक्स चौक, मिलिंदनगर, पिंपरी) यासह इतर तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हैदर जावेद सय्यद (वय २६, रा. काशिद अपार्टमेंट, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील हॉटेल चुला येथे हैदर सय्यद हे त्यांच्या मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी हैदर सय्यद यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवित रॅम्बो चाकूने पायावर वार करुन त्यांना जखमी केले. तसेच सय्यद यांच्या मित्रांना शिवीगाळ करत मारण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.