पतंगांनी घेतला 'त्या' दोघांचा जीव! जळगावात मकरसंक्रांतीच्या दिवशीच घडल्या दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 15:19 IST2022-01-14T15:19:30+5:302022-01-14T15:19:53+5:30
आज मकर संक्रांतीमुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. जळगावकरांसाठी आजचा दिवस मात्र, दुःखदायक ठरलाय.

पतंगांनी घेतला 'त्या' दोघांचा जीव! जळगावात मकरसंक्रांतीच्या दिवशीच घडल्या दुर्दैवी घटना
मकरसंक्रांतीच्या दिवशीच जळगावात दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पतंगाच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका घटनेत पतंग उडवण्यासाठी जाऊ दिलं नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या घटनेत पतंग उडवताना विजेच्या तारांचा शॉक लागून 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना काही तासांच्या अंतराने घडल्याने जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज मकर संक्रांतीमुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. जळगावकरांसाठी आजचा दिवस मात्र, दुःखदायक ठरलाय. पतंगाच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागलाय. जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात, पतंग उडवत असताना विजेचा शॉक लागून हितेश ओंकार पाटील नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार हितेशचं पतंग विजेच्या तारांवर अडकलं होतं. ते पतंग काढताना त्याला विजेचा शॉक लागला.
दुसरी घटना शहरातील कांचननगरात घडली. पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून यश रमेश राजपूत यानं झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना घडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.