"Killing us will save you from evil, and you will not die." | "आम्हाला ठार मारूनच वाईट शक्तीपासून सुटका होईल आणि तुम्हीही मरणार नाही"

"आम्हाला ठार मारूनच वाईट शक्तीपासून सुटका होईल आणि तुम्हीही मरणार नाही"

मदनापल्ली (आंध्र प्रदेश) : मदनापल्ली (जिल्हा चित्तूर) गावातील मास्टर माइंड आयआयटी टॅलेंट स्कूलच्या प्राचार्य व्ही. पद्मजा आणि त्यांचे पती डॉ. व्ही. पुरुषोत्तम नायडू यांना त्यांच्या मुली अलेख्या (२५) आणि साई दिव्या (२२) यांच्या हत्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली.

पद्मजा यांना तालुक्याच्या रुग्णालयात कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आणण्यात आले तेव्हा त्यांचे वर्तन असंबद्ध होते. ‘कोरोना चीनमधून आलेला नाही. तो शिवाकडून आलेला आहे. मी शिवा असून, कोरोना मार्चपर्यंत निघून जाईल’, असे त्या वैद्यकीय कर्मचारी चाचणीसाठी लाळेचा नमुना घेत असताना म्हणाल्या. पुरुषोत्तम नायडू हे मदनपल्लीतील सरकारी पदवी महाविद्यालयात उपप्राचार्य आणि असोसिएट प्रोफेसर (रसायनशास्त्र) आहेत. आलेख्या आणि साई दिव्या यांची या दोघांनी एका टोकाला जाड मूठ असलेल्या सोट्याने (डंबेल) टीचर्स कॉलनीत २४ जानेवारी रोजी घरात हत्या केली. 

मंगळवारी पद्मजा या संतप्त मानसिक अवस्थेत होत्या तर नायडू कोविड चाचणीसाठी लाळेचा नमुना दिल्यानंतर शांतपणे उभे होते. दोन मुलींची हत्या झाली अशा कोणत्या घटना घडल्या, असे विचारल्यावर नायडू यांनी ‘कोणतेही भाष्य नाही’ असे उत्तर दिले.
दिवाणी न्यायाधीशांच्या निवासस्थानी या दोघांना मंगळवारी सायंकाळी हजर करण्यात आले होते. या जोडप्याची माहिती असलेले लोक, घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि या दोघांनी जे सांगितले त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. दिसते असे की, हे संपूर्ण कुटुंब काेणत्या तरी टोकाच्या धार्मिक श्रद्धेत गुंतलेले आहे व त्यातूनच दोघींची हत्या झाली, असे मदनपल्ली तालुक्याचे पोलीस उपअधीक्षक रवी मनोहर आचारी यांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अलेख्या ही एमबीएची पदवीधर होती व ती नागरी सेवा परीक्षांची तयारी करीत होती. तिच्या डोक्यात डंबेलने मारल्याचे, केस जळाल्याचे आणि धातुचा तुकडा तिच्या तोंडात कोंबल्याचे पोलिसांना आढळले. साई दिव्या ही चेन्नईतील ए. आर. रहमान म्युझिक अकॅडेमीत नृत्य शिकत होती. तिला त्रिशूळाने भोसकले होते व डंबेलने मारले होेते. पालकांना कोणतीही इजा झाली नव्हती. ते म्हणत होते की, मुली परत येतील. पद्मजा व पुरुषोत्तम नायडू यांच्यासोबत काम करणारे आणि इतरांनी म्हटले की, हे जोडपे अशा अगम्य व्यवहारांत गुंतलेले असेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

घरात सापडले लिंबू आणि कोरफड
नायडू कुटुंब गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीनमजली घरात राहायला गेले होेते. धार्मिक समारंभाचा भाग असलेले लिंबू आणि कोरफड घरात होेते. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटींवर सांगितले की, ‘मुलींनी पालकांना सांगितले की, आम्हाला ठार मारूनच वाईट शक्तीपासून सुटका होईल आणि तुम्हीही मरणार नाही’ असे दिसते. मानसिक आजारासाठी या कुटुंबातील कोणी उपचार घेत होते का, याची आम्ही खातरजमा करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: "Killing us will save you from evil, and you will not die."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.