मिरजेत डोक्यात दगड घालून, गळा चिरून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 12:06 IST2020-12-06T12:05:54+5:302020-12-06T12:06:06+5:30
Crime News:

मिरजेत डोक्यात दगड घालून, गळा चिरून तरुणाचा खून
मिरज (जि. सांगली) : मिरजेत रेल्वे कर्मचारी वसाहतीजवळ समतानगर येथे गोविंदा मुत्तीकोळ (वय ४०) या तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरून खून करण्यात आला. रविवारी मध्यरात्री गोविंदा मुत्तीकोळ याचा खून करून हल्लेखोर पसार झाले.
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.
मृत तरुणाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. अंमली पदार्थाचा व्यसनी गोविंदा आई सोबत समतानगर येथे वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री तीन वाजता समतानगर येथे जुन्या हरिपूर रस्त्यावर दोन ते तीन हल्लेखोरांनी निर्घृणपणे गोविंदाचा खून केला. धारदार हत्याराने त्याचा गळा चिरून डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे दिसून आले.
घटनास्थळी गांधी चाैक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक प्रविणकुमार कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही. गोविंदा याच्यासोबत रात्री असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनी मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याचा खून करण्यांत आल्याचा संशय आहे. मिरजेतील समतानगर माणिकनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ होत असून दोन दिवसापूर्वी येथे गुन्हेगांरांच्या टोळक्याने खंडणीसाठी समीर शेख या तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.