Indian Woman Death In Sharjah: संयुक्त अरब अमिरातीमधील एका अपार्टमेंटमध्ये एका भारतीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. ही महिला केरळमधील कोल्लमची रहिवासी होती आणि तिच्या आत्महत्या केल्याची माहिती तिच्या पतीने दिली. दुसरीकडे, पतीने हुंड्यासाठी मुलीचा अमानुष छळ करुन तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. महिलेच्या कुटुंबियांनी केरळ पोलिसांकडे पतीनेच मुलीची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी म्हणून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पतीने माध्यमांशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मृत महिलेचे नाव अतुल्या शेखर असून १९ जुलै रोजी तिचा मृतदेश शारजाह येथील घरात आढळून आला होता. अतुल्या शेखरचा २०१४ मध्ये कोल्लम इथल्या सतीशशी विवाह झाला होता आणि शारजाहला स्थायिक झाली. हवा तेवढा इच्छित न मिळाल्यामुळे, तिचे सासरचे लोक तिला त्रास देत होते, असा आरोप अतुत्याच्या आईने केला. १८ ते १९ जुलै दरम्यान सतीशने तिचा गळा दाबला, पोटात लाथ मारली आणि डोक्यावर प्लेटने मारले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या आईने केला आहे. अतुल्याच्या वाढदिवशी आणि कामाचा पहिला दिवशीच हा सगळा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अतुल्याच्या आईने सांगितले की, सतीशला हुंडा म्हणून ४० हून अधिक सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी दिली होती. मात्र त्यानंतरही अतुल्याचा छळ सुरु होता. सध्या पोलिसांनी सतीशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. "अतुल्या आणि सतीश यांना एक मुलगी देखील आहे. सतीश माझ्या मुलीला दारू पिऊन अनेकदा मारहाण करायचा. सतीश तिला नेहमी मारहाण करत असल्याने एकदा मी तिला घरी परत आणण्याचा विचार करत होतो पण सतीशने अतुल्याची माफी मागितली. अतुल्यानेही त्याला माफ केले," असं अतुल्याच्या वडिलांनी सांगितले.
याप्रकरणी या प्रकरणाबाबत यूएईच्या माध्यमांशी बोलताना सतीशने हे आरोप फेटाळून लावले. अतुल्याच्या मृत्यूत माझी कोणतीही भूमिका नसल्याचे त्याने सांगितले. अतुल्या आत्महत्या करू शकते असे मलाही वाटत नाही, असंही सतीशने सांगितले.
दरम्यान, अतुल्याच्या कुटुंबाने एक व्हिडिओ समोर आणला आहे ज्यामध्ये अतुल्याच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसत आहेत.सतीश तिला मारहाण करण्यासाठी प्लास्टिकचा स्टूल उचलताना दिसत आहे.