इंजिनिअर जावई शोधला, लग्नात ६० लाखांचा खर्च; हुंड्यासाठी छळ, लेकीने ६ महिन्यांत आयुष्य संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:02 IST2025-11-27T14:00:21+5:302025-11-27T14:02:51+5:30
गुरुराज सरकारी नोकरीत असल्याने लताच्या पालकांनी त्याला मोठा हुंडा दिला.

फोटो - tv9hindi
कर्नाटकातील शिवमोगा येथे हुंड्याच्या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. तिने भद्रा बलदंडा कालव्यात उडी मारली. महिलेच्या सासरच्यांना हे कळताच ते पळून गेले. पतीचा फोन बंद आहे. होलेहोन्नूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावतीतील डी.बी. गावातील रहिवासी लता आणि शिकारीपुरा तालुक्यातील दिंडिनहल्ली गावातील रहिवासी गुरुराज यांचं लग्न १४ एप्रिल २०२५ रोजी झालं होतं.
गुरुराज भद्रा धरणातील केपीसीएलमध्ये एईई (इंजिनिअर) म्हणून काम करत होता. गुरुराज सरकारी नोकरीत असल्याने लताच्या पालकांनी त्याला मोठा हुंडा दिला. लग्नात एकूण ६० लाख खर्च केले, ज्यामध्ये ३० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० लाख रोख रक्कम होती. एवढा हुंडा देऊनही सासरच्या लोकांचं समाधान झालं नाही.
लताच्या कुटुंबाचा आरोप आहे की, लग्नाच्या एका महिन्यानंतरच तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. लताच्या कुटुंबाने गुरुराजचे इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोपही केला. त्यांनी असा दावा केला की, त्यांच्या जावयाचे कुटुंबातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. लताने तिच्या सुसाईड नोटमध्ये हे सर्व लिहिलं आहे.
जूनमध्ये लता भद्रावती तालुक्यातील डी.बी. गावात तिच्या घरी आली. आषाढ महिना उलटूनही, गुरुराज आपल्या पत्नीला तिच्या सासरच्या घरी घेऊन जाण्यासाठी आला नाही. या सगळ्यामुळे लता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. त्यामुळे सुसाईड नोटमध्ये लताने पतीच्या बहिणी नागरत्ना आणि राजेश्वरी, तिची सासू शारदाम्मा, नवऱ्याच्या बहिणीचा नवरा कृष्णप्पा आणि गुरुराज यांना जबाबदार धरलं आहे.
२३ नोव्हेंबर रोजी लताने भद्रावती तालुक्याच्या सीमेवरील सिद्धपुरा गावाजवळ तीराच्या कालव्यात उडी मारली. मरण्यापूर्वी तिने तिच्या बांगड्या आणि मोबाईल कालव्याजवळील एका मंदिरात ठेवला. तिने घरी एक सुसाईड नोट देखील ठेवली. मुलीच्या कृत्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.