काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:45 IST2025-04-15T14:44:23+5:302025-04-15T14:45:31+5:30
या महिलेला अक्षरशः काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 7 एप्रिलला बेंगळुरुतील तवरेकेरे भागात स्थित जामा मशिदीबाहेर घडली.

काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा'
कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने स्थानिक मशिदीत आपल्या पत्नी विरुद्ध तक्रार केल्यानंतर, जमावाने या महिलेला बेदम मारहाण केली आहे. या महिलेला अक्षरशः काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 7 एप्रिलला बेंगळुरुतील तवरेकेरे भागात स्थित जामा मशिदीबाहेर घडली. हा संपूर्ण प्रकार कॅरेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. संबंधित पीडित महिलेचे नाव शबाना बानो असून ती 38 वर्षांची आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण -
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित शबाना बानो ही घरकाम करणारी महिला आहे. ७ एप्रिल रोजी, तिच्या घरी तिची एक नातेवाईक नसरीन तिला भेटण्यासाठी आली. दरम्यान, फयाज नावाचा एक तरुणही त्यांच्या घरी पोहोचला. यानंतर, हे तिघेही थोड्या वेळासाठी बाहेर फिरण्यासाठी गेले. यानंतर ते पुन्हा शबानाच्या घरी परतले. तेवढ्यात, शबानाचा पती जमील अहमद घरी आला. त्याने नसरीन आणि फयाजला तेथे बघितले आणि तो संतापला. त्याने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार तवरेकेरे येथील जामा मशिदीत केली.
दोन दिवसांनंतर मशिदीत बोलावू करण्यात आला हल्ला -
तक्रार दाखल झाल्याच्या दोन दिवसांनंतर, अर्थात ९ एप्रिलला, शबाना, नसरीन आणि फयाज यांना मशिदीकडून बोलावण्यात आले. हे तिघे तेथे पोहोचताच त्यांच्यावर अचानकपणे सहा जणांनी हल्ला केला. या हल्लेखोरांनी तिला काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली.
यानंतर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे सहा आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद नियाज (32) - ड्राइवर, मोहम्मद गौसपीर (45) – भंगारवाला, चांद बाशा (35) – उसाचा रस विक्रेता, दस्तगीर (24) – बाईक मेकॅनिक, रसूल टीआर (४२) – बुक्कामबुडी तलावातील मच्छीमार, इनायत उल्ला (५१) – स्थानिक रहिवासी, अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींविरुद्ध कट रचणे, गंभीर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.