उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून टाकलं. चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे मृत व्यक्ती एखाद्याच्या स्वप्नात येते आणि त्याच्या हत्येबद्दल सांगते, त्याचप्रमाणे प्रत्यक्षातही घडलं आहे. रक्षाबंधनाच्या रात्री कानपूरमध्ये राहणाऱ्या पूजाला स्वप्नात तिचा भाऊ शिवबीर दिसला. तो पूजाला सांगत होता की त्याचा खून झाला आहे. या स्वप्नामुळे पूजाला धक्का बसला आणि त्रास झाला. ती खूप अस्वस्थ झाली. या स्वप्नाच्या आधारे चौकशी सुरू झाली तेव्हा जे समोर आलं त्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
पूजाने आपली आई सावित्री देवीला तिच्या या स्वप्नाबद्दल सांगितलं. तेव्हा कुटुंबातील सदस्यांना संशय येऊ लागला. सुनेचं वागणं पाहून संशय आणखी वाढला. सावित्री देवीला आधीच सून मालतीच्या वागण्यावर खूप संशय होता. तिच्यामुळे बराच काळ मुलाशी संपर्क साधता आला नाही. जेव्हा जेव्हा ती तिच्या सुनेला मुलाशी बोलायचं आहे असं सांगायची तेव्हा ती कारणं द्यायची. यामुळे कुटुंबाचा संशय आणखी बळावला.
मुलाच्या हत्येची भीती
सावित्री देवी धाडस एकवटून थेट पोलीस आयुक्तांकडे गेली. तिथे तिने आयुक्तांसमोर आपल्या मुलाच्या हत्येची भीती व्यक्त केली. प्रकरण गांभीर्याने घेत डीसीपी दिनेश त्रिपाठी यांनी तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी प्रथम मालतीच्या मोबाईल कॉल डिटेल्सची तपासणी केली. तपासात असं दिसून आलं की तिचा पती शिवबीरशी बोलण्याऐवजी ती सतत तिचा पुतण्या अमितच्या संपर्कात होती.
गळा दाबून खून
पोलिसांना येथून शिवबीरच्या हत्येच्या कटाचा धागा सापडला. पोलीस तपासात असं दिसून आलं की, गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी मालतीने तिचा पती शिवबीरला विषारी चहा दिला होता. यानंतर तिने तिचा पुतण्या अमितसह त्याचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, मृतदेह घराबाहेर नेऊन बागेत पुरण्यात आला. त्यावर मिठाची १० पाकिटं टाकण्यात आली, जेणेकरून मृतदेह लवकर कुजेल आणि कोणालाही संशय येऊ नये.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला पडलं स्वप्न
हत्येनंतर मालतीने शिवबीर नोकरीसाठी गुजरातला गेला आहे असं सांगून कुटुंबाची दिशाभूल केली. वेळोवेळी ती बनावट फोन कॉल्सबद्दलही बोलत राहिली. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला पडलेलं स्वप्न या कथेतील सर्वात महत्त्वाचा वळण ठरलं. तपासाच्या आधारे, पोलिसांनी प्रथम अमितला अटक केली. त्यानंतर मालतीलाही ताब्यात घेण्यात आलं. तिच्या माहितीवरून घराजवळ पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला.