ज्युडो चॅम्पियन महिलेने एकच किक मारली; पतीचे हाडच मोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 14:05 IST2020-01-27T14:02:14+5:302020-01-27T14:05:44+5:30
आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. खेळातही भारतीय महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवत आहेत.

ज्युडो चॅम्पियन महिलेने एकच किक मारली; पतीचे हाडच मोडले
नोएडा : आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. खेळातही भारतीय महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवत आहेत. परंतू, अशाच एका महिला खेळाडूने मारलेली किक तिच्या पतीला भारी पडली आहे. डोळे विस्फारू नका, त्यांच्यात काही भांडण वगैरे झालेले नव्हते.
ही महिला ज्युडो चॅम्पियन आहे. खरेतर तिला घरातील जबाबदारीमुळे सरावासाठी बाहेर जाता येत नव्हते. यामुळे तिच्या पतीने तिला घरातच सराव करण्यास सांगितले होते. यासाठी तो तिला मदतही करत होता. अशाप्रकारे ती सराव करत असताना मदत करणाऱ्या पतीच्या पायावरच तिची किक बसली आणि हाड मोडले.
ही घटना नोएडाच्या सेक्टर 19 मध्ये घडली. या व्यक्तीची पत्नी काही दिवसांपासून सरावाला जाऊ शकली नव्हती. यामुळे पतीने तिला रविवारी घरातच सराव करण्यास सांगितले. यावेळी हा प्रकार घडला. वेदनेने विव्हळत असलेल्या पतीला त्याची पत्नी जिल्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. याचवेळी कोणीतरी मारहाण झाल्याची अफवा पसरवली आणि हे प्रकरण पोलिसांत गेले.
पोलिसांनी थेट हॉस्पिटल गाठले मात्र तोपर्यंत डॉक्टरांनी तिच्या पतीला उपचार करून घरी पाठवले होते. यानंतर पोलिस ठाण्याचे एसएचओ राजवीर सिंह चौहान यांनी माहिती मिळालेली पण तक्रार केली नसल्याचे सांगितले.