Pahalgam Hotel Crime: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्हा कोर्टाने महाराष्ट्रातील ७० वर्षीय महिला पर्यटकावर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना समाजाच्या नैतिक रचनेवर टीका केली. ही घटना समाजात असलेल्या विकृत मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, असंही कोर्टाने म्हटलं. अनंतनागचे प्रधान सत्र न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना यांनी शुक्रवारी पहलगाम येथील रहिवासी असलेल्या आरोपी झुबेर अहमदची जामीन याचिका फेटाळली. ही धक्कादायक घटना ही दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथील एका हॉटेलमध्ये घडली होती. पीडित महिला एप्रिलमध्ये तिच्या कुटुंबासह पहलगाममध्ये आली होती.
११ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील ७० वर्षीय महिला पर्यटकावर बलात्कार झाला होता. आरोपीने महिलेच्या हॉटेलच्या खोलीत जबरदस्तीने घुसून तिला ब्लँकेटने बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने खिडकीतून पळ काढला होता. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली. ही घटना इतकी क्रूर होता की पीडिता बसू शकत नव्हती किंवा हालचाल करू शकत नव्हती. अनेक दिवस तिला वेदना होत होत्या.
"संत आणि ऋषींच्या या भूमीला भेट देण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ महिलेला इतकी वाईट आणि धक्कादायक वागणूक देण्यात आली की तिला पर्यटनासाठी हे ठिकाण निवडल्याबद्दल पश्चात्ताप होईल. विकृत मानसिकतेचे प्रतिबिंब आहे," असं कोर्टाने दुःख व्यक्त करत म्हटलं. वैद्यकीय मत, फॉरेन्सिक अहवाल आणि पीडितेचे जबाब प्रथमदर्शनी बलात्काराचे आरोप सिद्ध करतात. अर्जात नमूद केलेल्या कोणत्याही कारणांमध्ये आणि आरोपीच्या वकिलाच्या युक्तिवादांमध्ये मला असे काहीही आढळत नाही की ज्यामुळे आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा कायदेशीरदृष्ट्या अवास्तव वाटेल. ही घटना दुर्लक्षित करता येईल अशी नाही. समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि विकृत मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. ज्यामुळे समाजाला शरमेने मान खाली घालावी लागत आहे, असंही न्यायाधीशांनी म्हटलं.
दरम्यान, आरोपीने त्याच्या वकिलामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्याने पोलिसांवर वैयक्तिक शत्रुत्वामुळे या प्रकरणात गुंतवल्याचा आणि पक्षपातीपणा दाखवल्याचा आरोप केला. तपासात सहकार्य करत असतानाही कोणतीही ओळख परेड न करता अटक करण्यात आल्याचा युक्तीवाद आरोपीने केला. कोर्टाने मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असून केस डायरी फाइल प्रथमदर्शनी पाहिल्यास एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर अतिशय क्रूर पद्धतीने बलात्कार झाल्याचे उघड झाल्याचे म्हटलं.