राजस्थानची राजधानी जयपूरमधील करधनी पोलीस स्टेशन परिसरातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. ३१ वर्षीय नवीन सिंहने आईशी वाय-फाय कनेक्शनवरून भांडण केलं आणि रागाच्या भरात तिची हत्या केली. आरोपीने तिचा गळा दाबला. काठीने डोक्यावर वार केला, ज्यामुळे आई गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला.
आरोपीचे वडील लक्ष्मण सिंह हे सध्या दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहेत, त्यांनी आपल्या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ते म्हणाले, "तो एकुलता एक मुलगा होता पण त्याने त्याच्या आईची हत्या करून कुटुंब उद्ध्वस्त केलं. त्याला फाशी द्या. आमचा त्याच्याशी आता काहीही संबंध नाही."
लक्ष्मण सिंह यांनी असंही सांगितलं की नवीनला ड्रग्जचं व्यसन होतं आणि बहुतेक वेळा तो त्याच्या खोलीतच राहायचा. कुटुंब त्याच्यामुळे त्रासत होते आणि त्याच्या वडिलांनी अनेक महिन्यांपासून त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं.
नवीन सिंहकडे बीए पास आहे आणि तो पूर्वी जेनपॅक्ट कंपनीमध्ये काम करत होता. तो सध्या बेरोजगार होता आणि त्याच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे त्याचं त्याच्या कुटुंबाशी वारंवार भांडण होत असे.
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि एफएसएल टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले. हत्येत वापरलेली काठी देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे.