मामेभावानेच रस्त्यात अडवले अन् मारहाण करत १२ हजार लुटले; नागपुरातील घटना
By योगेश पांडे | Updated: October 9, 2023 21:18 IST2023-10-09T21:18:36+5:302023-10-09T21:18:55+5:30
खिशातून १२ हजारांची रोख घेऊन पळ काढला

मामेभावानेच रस्त्यात अडवले अन् मारहाण करत १२ हजार लुटले; नागपुरातील घटना
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: डेली कलेक्शन करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या मामेभावानेच रस्त्यात अडविले आणि त्याला मारहाण करत खिशातून १२ हजारांची रोख घेऊन पळ काढला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राजेश रामभाऊ नागदेवे (५२, यादवनगर) हे डेली कलेक्शनचे काम करतात. ते शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे डेली कलेक्शनच्या कामासाठी यादवनगर येथील गल्ली क्रमांक २६ येथे उभे होते. त्यावेळी त्यांचा मामेभाऊ प्रवीण उर्फ दादा पापाजी मोटघरे (३०, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, यादवनगर) हा त्यांच्याजवळ आला. त्याने काहीच कारण नसताना राजेश यांना शिवीगाळ केली व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने त्यांच्या खिशातून १२ हजार रुपये हिसकावले व तेथून पळ काढला. यानंतर राजेश यांनी कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मामेभावाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रवीणविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.