मित्रानेच साराला केले आत्महत्येस प्रवृत्त, मेकअप आर्टिस्ट आत्महत्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:33 IST2023-06-22T12:32:56+5:302023-06-22T12:33:08+5:30
कश्यप हा बँकर असून, तो सारासोबत गेल्या २ ते ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता.

मित्रानेच साराला केले आत्महत्येस प्रवृत्त, मेकअप आर्टिस्ट आत्महत्या प्रकरण
मुंबई : सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सारा यंथन हिला मित्र दानिश कश्यप याने आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून खार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
कश्यप हा बँकर असून, तो सारासोबत गेल्या २ ते ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णयही घेतला आणि खार येथील निवासस्थानी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खार दांडा येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून या जोडप्यामध्ये भांडणे होत होती आणि काही कारणांमुळे कश्यपने तिच्यासोबतचे नाते तोडले.
साराने त्याला अनेकवेळा कॉल केले आणि मेसेजही केले. पण त्याने कोणत्याही कॉल आणि मेसेजला प्रतिसाद दिला नाही. साराने तिचा जीवलग मित्र करीमला एक संदेश पाठवला, ज्यात तिने लिहिले की, “माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे
आणि मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूसाठी तोच जबाबदार आहे.” साराने रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास करीमला हा मेसेज
पाठवला होता.