आदित्य नावाच्या मुलाने अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेला मुलगा अल्पवयीन होता. आदित्यला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलले होते. पण, तिथे त्याच्या अंगावरील कपडे काढून नग्न करण्यात आले. अंगावर लघुशंका केली, असे आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती येथे ही घटना घडली.
पोलीस अधिकारी प्रदीप कुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य नावाच्या मुलाने आत्महत्या केली. या प्रकरणी कप्तानगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्यच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
मयत आदित्यच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. आदित्यला मारहाण करून अपमानित करण्यात आले होते. अपमानाच्या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे आदित्यच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
आदित्यचे काका विजय कुमार यांनी सांगितले की, त्याला वाढदिवसाच्या पार्टीसाठी गावात बोलवण्यात आले होते. हे पूर्वनियोजित होतं की, नाही माहिती नाही. पण, आरोपींनी त्याला नग्न केले आणि मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावर लघुशंका केली. जेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेलो, तेव्हा पोलिसांनी आमची तक्रारच घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.
२० डिसेंबर २०२४ रोजी ही घटना घडली. पण, आम्हाला दुसऱ्या दिवशी कळली. या घटनेनंतर आदित्य मध्यरात्री घरी आला. त्यानंतर सकाळी त्याने आम्हाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले, पण पोलिसांनी तीन दिवस गुन्हाच दाखल केला नाही. त्यानंतर त्या लोकांनी आदित्यचा पुन्हा छळ केला आणि त्यानंतर आदित्यने आत्महत्या केली, असे प्रदीप कुमार यांनी सांगितले.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.