Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अहिल्यानगरच्या ४ बहिणींवरील अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याने पोलिसांनाही धक्का बसला. बलात्काराचा तपास सुरू असतानाच खुनाचा गुन्हा उघड झाल्याने खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी बजरंग साळुंके याने बायकोच्या भावाचाही खून केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. पोलिसांनी त्याला दवणगाव शिवारात नेल्यानंतर त्याने सहा महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह पोलिसांनी उकरून बाहेर काढला. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी मृतदेहाची जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली.
दवणगावच्या बजरंग साळुंके याने चार महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. या अल्पवयीन मुली त्याच्या दूरच्या नातेवाईक होत्या. मुलींचे आई-वडील विभक्त झाल्याने त्यांनी त्यांच्या चार मुलींना साळुंकेकडे ठेवले होते. दरम्यान त्यातील एकीचे लग्न झाले. तीन मुली साळुंके व त्याची पत्नी शीतल साळुंके (वय ४०) हिच्याकडे राहत होत्या. याशिवाय साळुंकेचा मेहुणा नीलेश सारंगधर (३२) हाही त्यांच्याकडेच राहण्यास होता.
तीनही मुलींवर आरोपी साळुंके याने वेळोवेळी अत्याचार केला. याची माहिती या मुलींनी त्यांच्या विवाहित मोठ्या बहिणीला दिली. या प्रकरणी पीडित मुलींनी 'स्नेहालया'च्या मदतीने १७ सप्टेंबर २०२५ रोजी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी बजरंग साळुंके व त्याला मदत केल्याप्रकरणी त्याची पत्नी शितल साळुंके या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणात साळुंकेचा मेहुणा निलेश सारंगधर याच्यावरही गुन्हा दाखल होता. त्यामुळे पोलीस त्याचाही शोध घेत होते.
मात्र बजरंग साळुंके याने कोठडीत असताना चौकशीदरम्यान मेहुणा निलेश सारंगधर याचा खून केल्याची कबुली दिली. सारंगधर हाही या मुलींवर अत्याचार करत होता. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी भर दिवसा सारंगधर याचा बजरंग याने गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीच्या मदतीने घरालगत खड्डा खोदून त्यात त्याला पुरले. पोलिसांनी मंगळवारी बजरंग साळुंके याला दवणगाव शिवारात आणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली व मृतदेह बाहेर काढला.
बजरंग साळुंके याने पीडित मुलींवर अत्याचार करण्यापूर्वी मेहुण्याचा खून केला होता. घटनेला सहा महिने उलटून गेले तरीही मेहुणा नीलेश सारंगधर याच्याबाबत साधी बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दाखल नव्हती. कारण सारंगधर याचे आई-वडील मयत झाल्याने तो बहीण शितल साळुंके हिच्याकडेच राहत होता. त्यामुळे यात कोणीही तक्रार केली नाही. मात्र अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणामुळे खुनाचे हे प्रकरण समोर आले.