साेलापूरसह नगर, पुणे, कर्नाटकात घरफोडी करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद
By Appasaheb.patil | Updated: January 6, 2023 20:04 IST2023-01-06T19:59:59+5:302023-01-06T20:04:05+5:30
६ गुन्हे उघडकीस, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

साेलापूरसह नगर, पुणे, कर्नाटकात घरफोडी करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यासह अहमदनगर, पुणे, कर्नाटक राज्यात रात्रीच्या सुमारास घरफोडी, चोरी करणारे आंतरजिल्हा गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे सहा गुन्हे उघडकीस आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी लोकमत शी बोलताना दिली.
स्थानिक गुन्हे शाखेेचे पथक पंढरपूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना विविध गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अकलूज येथून पंढरपूरकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांच्या पथकाने पंढरपूर शहरातील सरगम टॉकीजच्यासमोर सापळा लावला. काही वेळानंतर केबीपी कॉलेज परिसरात एक कार येत असल्याची दिसली. पोलिसांनी त्या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालकाने गाडी न थांबविता तसाच निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून रेल्वे पुलाखाली त्या कारचालकास पकडले. कारमधील चालकास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारामाफर्त पंढरपूर शहर, सोलापूर शहर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात घरफोडी व चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे ८९ ग्रॅम वजनाचे, चांदीचे ५०० ग्रॅम वजनाचे दागिने व कार असे मिळुन एकुण ४ लाख १५ हजार ८५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस ठाणे करीत आहेत.