१०० सीसीटीव्ही तपासून सराईत चोराला अटक, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत, माणिकपूर पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:00 IST2024-12-19T19:59:53+5:302024-12-19T20:00:01+5:30
बाभोळा येथील कौल हेरिटेज सिटीतील अग्रवाल पेस हेवन बिल्डिंग नंबर १० मध्ये राहणाऱ्या अर्चना तावडे (३९) यांच्या घरी १३ डिसेंबरला रात्री लाखोंची घरफोडी झाली होती.

१०० सीसीटीव्ही तपासून सराईत चोराला अटक, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत, माणिकपूर पोलिसांची कामगिरी
- मंगेश कराळे
नालासोपारा : लाखोंची चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला तब्बल १०० सीसीटीव्ही तपासून अटक करण्यात माणिकपूरच्या गुन्हे प्रकाटिकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. आरोपीकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
बाभोळा येथील कौल हेरिटेज सिटीतील अग्रवाल पेस हेवन बिल्डिंग नंबर १० मध्ये राहणाऱ्या अर्चना तावडे (३९) यांच्या घरी १३ डिसेंबरला रात्री लाखोंची घरफोडी झाली होती. चोरट्यांनी बंद घराच्या हॉलमधील खिडकीतून प्रवेश करत बेडरूमच्या कपाटात ठेवलेले ८ लाख ८८ हजार ७१४ रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि ३ घड्याळ चोरी करून घरफोडी केली होती. माणिकपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेत गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक करण्याचे आदेश व सूचना दिल्या होत्या. माणिकपूरच्या गुन्हे प्रकाटिकरण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मागोवा घेतला. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तब्बल १०० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून आरोपी जात असलेल्या मार्गाचा मागोवा घेतला. आरोपी सन्नी निवाते (२७) याला स्टेला परिसरात सापळा रचून अटक केली आहे. अटक आरोपीकडून चोरी केलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीवर या अगोदर आचोळे पोलीस ठाण्यात पूर्वीचे ३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीलाल जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बालाजी दहीफळे, गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, प्रविण कांदे, भालचंद्र बागुल, अमोल बर्डे, मोहन खंडवी यांनी केली आहे.
पोलीस उपायुक्तांचे नागरिकांना आव्हान
नाताळ व नवीन वर्षाच्या सुट्या लागणार असल्याने अनेक नागरिक परिवारासह गावी किंवा फिरण्यासाठी जातील. त्यामुळे नागरिकांनी घरात महागड्या वस्तू, दागिने, रोख रक्कम घरात न ठेवता बँकेत ठेवावी. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सांगून जावे. घराला व खिडक्यांना लोखंडी ग्रील, सेफ्टी दरवाजे बसवावे. घराबाहेर व इमारतीत सीसीटीव्ही बसवून घ्यावे असे आवाहन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी केले आहे.