The infamous goons Gaja Marane were again arrested by Pune Police in Satara | कुख्यात गुंड गजा मारणेला पुन्हा बेड्या ठोकल्या; सातारमध्ये पोलिसांची धडक कारवाई

कुख्यात गुंड गजा मारणेला पुन्हा बेड्या ठोकल्या; सातारमध्ये पोलिसांची धडक कारवाई

 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या कुख्यात गँगस्टर गजानन मारणे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील मेढा येथे ताब्यात घेतले असून त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात येणार आहे. मारणेबरोबर त्याच्या तीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, गजानन मारणे याच्याविरोधात ग्रामीण पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे २२ फेब्रुवारी रोजी पाठविला होता. देशमुख यांनी हा प्रस्ताव २ मार्च रोजी मंजूर केला होता. तेव्हापासून ग्रामीण पोलीस दलाची तीन पथके मारणे याचा शोध घेत होती. तो कोल्हापूर, सातारा भागात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे
निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक दोडगे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके त्याचा शोध घेत होती. दोन दिवसांपूर्वी तो कोल्हापूरला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तिकडे गेली होती. पण तो पोलिसांना गुंगारा देऊन सातार्यात पळून आला होता. त्यानंतर सातारा पोलिसांच्या मदतीने जावळी तालुक्यातील मेढा येथे शनिवारी सायंकाळी गजानन मारणे याला पकडण्यात आले.
त्याच्याबरोबर आणखी ३ साथीदार होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गजानन मारणे याला अटक केल्यानंतर एमपीडीए कायद्यान्वये त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मारणे याच्या समर्थकांनी जंगी मिरवणुक काढली होती. पोलिसांना खुले आव्हान दिल्याने पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलिसांनी मारणेसह त्याच्या साथीदारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी कोथरुड व तळेगाव दाभाडे येथील दोन गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाला होता. मात्र, हिंजवडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याचा अटकपूर्व जामीन नुकताच फेटाळला होता.

गजानन मारणे हा जावळी तालुक्यातील मेढा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर ती सातारा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार मेढा पोलिसांनी बाजारपेठ रस्त्यावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु केली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांचे सहकार्यांनी एका कारमध्ये गजानन मारणे व त्याच्या साथीदार बसले असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने कारमधील सर्वांना ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण पोलीस मेढा पोलीस ठाण्यात पोहचले असून ते गजानन मारणे व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन पुण्याला आणतील व
त्यानंतर मारणे याची येरवडा कारागृहात  रवानगी  होईल.

Web Title: The infamous goons Gaja Marane were again arrested by Pune Police in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.