इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला.."; टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:25 IST2026-04-09T14:24:12+5:302026-04-09T14:25:38+5:30
प्रियांका आणि देवकृष्ण यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांनंतर २०१७ मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात प्रियांकाची ओळख कमलेश पुरोहितशी झाली.

इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला.."; टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
"तू दिसायला चांगला नाहीस, तुझा रंगही मला आवडत नाही. तू माझ्या लायकीचा नाहीस... मला तर एखादा देखणा आणि स्मार्ट मुलगा हवा होता," हे शब्द एका पत्नीने आपल्या पतीचा अपमान करण्यासाठी वापरले होते. मात्र, सौंदर्याचा हा अहंकार एका खुनी कटात बदलेल, असे कोणालाही वाटले नव्हते. धार जिल्ह्यातील गोंदीखेडा चारण गावात मिरची व्यापारी देवकृष्ण पुरोहित यांच्या हत्येचे गुढ उकलले असून, त्यांच्या पत्नीनेच, प्रियांकाने प्रियकराच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
११ वर्षांच्या संसारावर ९ वर्षांचे प्रेम जड!
प्रियांका आणि देवकृष्ण यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांनंतर २०१७ मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात प्रियांकाची ओळख कमलेश पुरोहितशी झाली. येथूनच त्यांच्या अनैतिक संबंधांना सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून देवकृष्णला प्रियांकाच्या या संबंधांची कुणकुण लागली होती, त्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. प्रियांका तीन वर्षे माहेरी राहिली, जिथे ती सतत कमलेशच्या संपर्कात होती.
१ लाखाची सुपारी अन्..
आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी प्रियांकाने प्रियकर कमलेशच्या मदतीने १ लाख रुपयांची सुपारी सुरेंद्र भाटी नावाच्या किलरला दिली. ३ एप्रिल रोजी हत्येचा पहिला प्रयत्न फसला होता, तेव्हा प्रियांकाने वॉट्सॲपवर किलरला "काम होत नसेल तर पैसे परत कर" अशी धमकीही दिली होती. अखेर सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री प्रियांकाने घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि कुटुंबातील सदस्यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. देवकृष्ण गाढ झोपेत असताना किलरने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा जीव घेतला.
दरोड्याचा बनाव अन् मगरीचे अश्रू
हत्या केल्यानंतर प्रियांकाने आरडाओरडा करून दरोड्याचा बनाव रचला. "काही मास्कधारी अज्ञात व्यक्ती घरात शिरले आणि त्यांनी मला खोलीत बंद केले आणि लूटमार करून पतीची हत्या केली," अशी खोटी कहाणी तिने पोलिसांना सांगितली. मात्र, सायबर सेल आणि क्राइम ब्रँचने जेव्हा प्रियांकाच्या मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट्स आणि लोकेशन तपासले, तेव्हा गुन्ह्याचे सर्व धागेदोरे तिच्यापर्यंत पोहोचले.
बहिणीने उघडले गुपित
मृत देवकृष्णची बहीण ज्योतीने सांगितले की, प्रियांका सुरुवातीपासूनच देवकृष्णचा तिरस्कार करायची. "भाऊ रंगाने काळा असल्याने ती त्याला नेहमी कमी लेखायची आणि स्वतःला खूप सुंदर समजायची. सौंदर्याच्या याच घमेंडीत तिने माझ्या भावाचा जीव घेतला." पोलिसांनी प्रियांका आणि तिचा प्रियकर कमलेशला अटक केली असून सुपारी किलर सुरेंद्र सध्या फरार आहे.