एकतर्फी प्रेमामुळे ७ जणांचा बळी; तरुणानं तरुणीची स्कूटी जाळली; संपूर्ण बिल्डिंगलाच आग लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 23:57 IST2022-05-07T23:55:19+5:302022-05-07T23:57:00+5:30
तरुणीवर राग काढण्यासाठी तरुणानं इमारतीखाली असलेली तिची स्कूटी पेटवली; आग वाढून इमारतीत शिरली

एकतर्फी प्रेमामुळे ७ जणांचा बळी; तरुणानं तरुणीची स्कूटी जाळली; संपूर्ण बिल्डिंगलाच आग लागली
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये काल एका इमारतीत आग लागली. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज होता. मात्र पोलीस तपासातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
शुभम दीक्षित नावाच्या तरुणाचं एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. तिचं लग्न इतरत्र ठरल्यानं शुभम संतापला होता. तरुणीच्या इमारतीखाली असलेली तिची स्कूटी पेटवायची असं शुभमनं ठरवलं. त्यानं तिच्या स्कूटीला आग लावली. मात्र ही आग इमारतीत पसरली. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला. आगीत तरुणी जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी शुभम दीक्षित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र ही आग लावण्यात आल्याची माहिती इंदूरच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री इंदूरमधील विजय नगरमध्ये असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागली. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री उशिरा अचानक इमारतीला आग लागली. धुराचे लोट दिसू लागले. काही कळायच्या आतच आगीनं भीषण स्वरुप धारण केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रयत्नांची शर्थ करत आग नियंत्रणात आणली.