इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, शिलाँग कोर्टाने प्रॉपर्टी ब्रोकर सिलोम जेम्सला जामीन मंजूर केला आहे. त्याच वेळी पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, इंदूरमधील भाड्याने घेतलेला फ्लॅट जिथे राजा रघुवंशीची पत्नी सोनमने हत्येनंतर आश्रय घेतला होता त्याची व्यवस्था याच ब्रोकरने केली होती. सोनम या फ्लॅटमध्ये सुमारे १४ दिवस राहिली. हा फ्लॅट हत्येपूर्वीही भाड्याने घेण्यात आला होता.
मेघालय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनमची चौकशी केल्यानंतर तिने कबूल केलं की राजा रघुवंशीच्या हत्येनंतर तिला काही काळ अंडरग्राऊंड राहायचं होतं. या कारणास्तव सोनम इंदूरला परतली आणि एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि त्यात लपून बसली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी काही काळ लपून राहणं आवश्यक आहे हे सोनमला माहित होतं. सोनम ज्या फ्लॅटममध्ये राहिली तो फ्लॅट लासुडिया पोलीस स्टेशन परिसरात आहे, त्याचं एग्रीमेंट विशाल सिंगच्या नावावर होतं.
इंदूरचे डीसीपी राजेश दंडोटिया यांनी दावा केला आहे की, सोनम याच भागात राहत होती. हा फ्लॅट ब्रोकर सिलोम जेम्सने घेतला होता. सिलोमने सोनमला तिच्या बॅगा आणि मौल्यवान दागिने लपवण्यास मदत केल्याचाही संशय होता. शिलाँग कोर्टाने आता त्याला जामीन मंजूर केला आहे, तसेच याच प्रकरणात इतर दोन आरोपींनाही जामीन मिळाला आहे.
चौकशीदरम्यान सोनमने सांगितलं की, फ्लॅटमध्ये लपून राहायची आणि १४ दिवस टीव्हीवर सुरू असणाऱ्या सर्व बातम्यांवर लक्ष ठेवायची. सोनम राजा रघुवंशी आणि स्वतःच्या हत्येशी संबंधित अपडेट्स देखील पाहत असे. ती ही सर्व माहिती तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाला पाठवत असे. याच दरम्यान राज अन्न आणि इतर आवश्यक वस्तू ऑनलाईन ऑर्डर करत होता आणि त्या सोनमला पोहोचवत होता. पण जेव्हा त्याला वाटलं की पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात, तेव्हा त्याने इंदूरहून उत्तर प्रदेशातील रामपूरला पळून जाण्याचा विचार केला.
१४ दिवस फ्लॅटमध्ये राहिल्यानंतर सोनम तिच्या बॉयफ्रेंडसोबत यूपीतील रामपूरला निघून गेली. राज कुशवाह मूळचा रामपूर जिल्ह्यातील एका गावातील आहे. दोघांनाही वाटलं की गावात पोलिसांपासून लपून राहणं सोपं जाईल. मात्र रस्त्यात असतानाच सोनमला तिच्या साथीदारांच्या अटकेची बातमी मिळाली. यानंतर ती गाझीपूरला पोहोचली, जिथे तिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक खोटी गोष्ट सांगितली. या हत्या प्रकरणात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.