Ind vs Eng: तर चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही भारत WTC च्या अंतिम फेरीसाठी ठरेल पात्र, असं आहे समीकरण
By बाळकृष्ण परब | Updated: March 3, 2021 20:37 IST2021-03-03T19:24:17+5:302021-03-03T20:37:40+5:30
Indian Cricket team News : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे.

Ind vs Eng: तर चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही भारत WTC च्या अंतिम फेरीसाठी ठरेल पात्र, असं आहे समीकरण
नवी दिल्ली - तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने आयसीसी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यास किंवा हा सामना अनिर्णित राखल्यास भारतीय संघ थेट अंतिम फेरीत जाणार आहे. मात्र या सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे. त्याच्यामागे एक विशिष्ट्य कारण आहे. (So even after losing the fourth Test, India will qualify for the WTC finals, that's the equation)
याआधीच्या समीकरणांनुसार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-१, २-१ किंवा २-० असा विजय मिळवल्यास भारतीय संघ विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. तर ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी असेल. मात्र आता ऑस्ट्रेलियाची ही संधी हुकण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आयसीसीकडे तक्रार केली आहे. तसेच दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्यांच्या गुणांमध्येही कपात करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता आयसीसीने अशी कारवाई केल्यास ऑस्ट्रेलियाची कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची अंधूक आशाही मावळणार आहे. या संदर्भातील वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपच्या रँकिंगमध्ये कोरोनामुळे बदल करण्यात आले आहे. आता सांघांची रँकिंग पर्सेंटेज पॉईंट्सच्या आधारावर निर्धारित होत आहे. भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीनंतर पॉईंट्स टेबलवर नजर टाकल्यास भारतीय संघ ७१ पर्सेंटेज पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ७० टक्के पर्सेंटेज पॉईंट्ससह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया ६९.२ पर्सेंटेज पॉईंट्ससह तिसऱ्या आणि इंग्लंड ६४.१ पर्सेंटेज पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.