शिवानीचं रौद्ररूप..! लोखंडी रॉडनं २ भावांना बेदम मारलं; भरचौकात राडा, ४०० लोक पाहत राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 20:48 IST2025-03-21T20:47:37+5:302025-03-21T20:48:07+5:30
२ महिन्यापूर्वी दोघांत वाद झाल्यानंतर ते एकमेकांशी बोलत नव्हते.

शिवानीचं रौद्ररूप..! लोखंडी रॉडनं २ भावांना बेदम मारलं; भरचौकात राडा, ४०० लोक पाहत राहिले
वर्धा - विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील अन् जिल्हा आयकॉन असणाऱ्या शिवानी सुरकारनं रौद्ररूप दाखवून दोन भावंडांना रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री १० च्या सुमारास धंतोली चौकात बॅचलर रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेवळी चांगलाच राडा झाला. नागरिकांचीही मोठी गर्दी झाल्याचं दिसून आले.
नितीन प्रभाकर सोळंके, अजय सोळंके असं जखमींची नावे आहेत. शिवानी सुरकार हिला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. शिवानी सुरकार हिने नितीन सोळंकेची दुचाकी पाडली. नितीनने हटकले असता तिने रॉडने डोक्यावर गळ्यावर मारले. त्याचा भाऊ अजय मध्यस्थीसाठी गेला असता त्यालाही रॉडने मारहाण करत जखमी केले. त्यानंतर घरात शिरून घरातील साहित्याची तोडफोड करत नुकसान केले. त्याशिवाय दाराला लाथा मारल्या तर दुचाकीचेही नुकसान केले.
२ महिन्यापूर्वीचा वाद...
नितीनची ओळख शिवानीसोबत ८ महिन्यापूर्वी झाली. दोघांत बोलचाल सुरू होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. २ महिन्यापूर्वी दोघांत वाद झाल्यानंतर ते एकमेकांशी बोलत नव्हते. १४ मार्चला स्वावलंबी मैदानात माय मॉर्निंग ग्रुपचा होळी कार्यक्रम होता. त्याठिकाणी शिवानीदेखील होती. नितीनने त्याचा मित्र धनंजय उईकेला घरी चलण्यास म्हटले, तेव्हा शिवानीने धनंजयला तू जायचे नाही असे म्हणत नितीनला शिवीगाळ केली होती.
व्हिडिओ, फोटो व्हायरल
शिवानी सुरकार आणि नितीन सोळंके यांच्या झालेल्या वादानंतर परिसरात जवळपास ३०० ते ४०० लोक जमले होते. उपस्थित नागरिकांनी आपापल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केले. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही वेळ वाहतूकदेखील खोळंबली होती.
पोलिसांशी घातली हुज्जत
घटनास्थळी शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले होते. मात्र शिवानीच्या रौद्ररूपाने त्यांनाही सोडले नाही. थेट पोलिसांशी हुज्जत घातली. शिवीगाळ करून अश्लील कृत्य केले. यामुळे परिसरात रात्रीच्या सुमारास काही वेळ तणाव निर्माण झाला होता.