नोकरीच्या पहिल्याच दिवशी नाईट शिफ्ट; सकाळी आढळला मृतदेह; धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 15:51 IST2022-05-01T15:48:36+5:302022-05-01T15:51:26+5:30

तरुण नर्सवर शारीरिक अत्याचार झाल्याची चर्चा होती, तसा आरोपही तिच्या कुटुंबीयांनी केला; पण पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली

in uttar pradesh Nurse found hanging in hospital family alleges gang rape and murder | नोकरीच्या पहिल्याच दिवशी नाईट शिफ्ट; सकाळी आढळला मृतदेह; धक्कादायक माहिती उघड

नोकरीच्या पहिल्याच दिवशी नाईट शिफ्ट; सकाळी आढळला मृतदेह; धक्कादायक माहिती उघड

उन्नाव: उत्तर प्रदेशातील उन्नावमधील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी एका १८ वर्षीय नर्सचा मृतदेह सापडला. हा नर्सचा कामाचा पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी तिला नाईट ड्युटी देण्यात आली. शुक्रवारी रात्री रुग्णालयात पोहोचलेल्या नर्सचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. नर्सच्या आईनं रुग्णालय संचालकांसह चार जणांविरोधात हत्येची तक्रार दाखल केली आहे. बांगरमऊतील दुल्लापुरवामध्ये घटना घडली आहे.

नर्सचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गळफास लावून घेतल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. पोलिसांनी नर्सच्या फोन कॉल्सचा तपशील तपासला. त्यानंतर पोलिसांनी संदीप नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी सुरू आहे. मृत तरुणी आणि संदीप यांचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती उन्नावचे एसपी दिनेश त्रिपाठी यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी संदीपचं लग्न अन्य तरुणीशी ठरलं. त्यामुळे प्रेमसंबंधातील तणाव वाढला. मृत्यूपूर्वी नर्सनं संदीपला अनेकदा मेसेज, कॉल केले. मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारासही तरुणीनं संदीपला कॉल केला होता. मात्र त्यानं कॉल घेतला नाही. त्यानंतर तरुणीनं आत्महत्या केल्याचं त्रिपाठी यांनी सांगितलं. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तरुणीचा मृतदेह सापडलेल्या रुग्णालयाचं उद्घाटन २५ एप्रिलला झालं. स्थानिक आमदार श्रीकांत कटियार यांच्या हस्ते रुग्णालयाचं उद्घाटन संपन्न झालं. रुग्णालयात कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत. रुग्णालय अवैधपणे सुरू असल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. रुग्णालयाकडून परवान्यासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णालयाची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: in uttar pradesh Nurse found hanging in hospital family alleges gang rape and murder