भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण...; अग्निवीर परीक्षेत फेल झालेल्या युवकाची सुसाईड नोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:17 IST2023-02-15T17:16:53+5:302023-02-15T17:17:26+5:30
मी आई वडिलांचे स्वप्न साकार करू शकलो नाही. या जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मात नक्कीच फौजी बनेन असं त्याने सांगितले.

भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण...; अग्निवीर परीक्षेत फेल झालेल्या युवकाची सुसाईड नोट
नोएडा - शहरातील सेक्टर ४९ येथील बरौली गावात राहणाऱ्या सैन्याच्या अग्निवीर परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकानं नापास झाल्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाच्या आत्महत्येच्या ठिकाणी पोलिसांना सुसाईड नोट आढळली आहे. ज्यात भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण तू नक्कीच बन आणि आई वडिलांची काळजी घे असं आत्महत्या केलेल्या युवकाने म्हटलं आहे.
१९ वर्षीय दीपू अग्निवीर परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे मानसिक तणावाखाली आला होता. या परिस्थितीत त्याने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी ३ पानी सुसाईड नोट सापडली. त्यात म्हटलं होतं की, मी ४ वर्षापासून खूप मेहनत घेतली. परंतु काहीच हाती लागले नाही. मी आई वडिलांचे स्वप्न साकार करू शकलो नाही. या जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मात नक्कीच फौजी बनेन असं त्याने सांगितले.
त्याचसोबत स्वप्न तुटलं आहे. मी फौजी बनलो नाही परंतु तू नक्कीच बन, आई वडिलांची काळजी घे असा संदेश आत्महत्या केलेल्या युवकाने भावाला दिला आहे. या घटनेबाबत एडिशनल डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, १९ वर्षीय दीपू छोटा भाऊ अमन आणि आत्याचा मुलगा अंशूसोबत बरौला इथं राहायचा. दीपू आणि त्याचा भाऊ नोएडा येथे सैन्यदलात भरती होण्याची तयारी करत होते. अलीकडेच त्याने सैन्याची परीक्षा दिली. ३० जानेवारीला या परीक्षेचा निकाल लागला. परंतु त्यात दीपू अनुत्तीर्ण झाला त्यानंतर तो तणावाखाली गेला होता.
खोलीत गळफास घेतला
दीपूचा भाऊ अमन आणि अंशू हे दोघे रुमच्या बाहेर गेले होते. तेव्हा एकटा असलेल्या दीपूने खोलीत पंख्याला लटकून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने तिथे पोहचले. तेव्हा दीपूने लिहिलेली सुसाईड नोट त्यांच्या हाती लागली. मृत दीपूचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. मात्र युवकाने उचललेल्या टोकाच्या पावलाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.