७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:02 IST2025-10-01T11:01:34+5:302025-10-01T11:02:05+5:30
७५ वर्षीय संगरू राम यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या वयात दुसरे लग्न करण्यावर अनेकांचा आक्षेप होता. परंतु संगरू राम यांनी कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते.

७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
जौनपूर - उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कुछमुछ गाव सध्या चर्चेत आहे. याठिकाणी ७५ वर्षीय संगरू राम आणि ३५ वर्षीय मनभावती यांचं सोमवारी लग्न झाले होते. परंतु लग्नाच्या रात्रीच एक अघटित घटना घडली त्यामुळे गावकरी हैराण आहेत.
संगरू राम यांचं आयुष्य एकाकी चालले होते. १ वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना मुलं नाहीत. शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या संगरू राम यांच्या कुटुंबातील अन्य लोक दिल्लीत व्यवसाय करतात. गावात संगरू राम एकटेच राहणारे वृद्ध गृहस्थ म्हणून ओळखले जात होते. मागील काही दिवसांपासून संगरू राम यांच्या दुसऱ्या लग्नाचा विषय समोर आला. गावातील लोकांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी ७५ वर्षीय संगरू राम यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या वयात दुसरे लग्न करण्यावर अनेकांचा आक्षेप होता. परंतु संगरू राम यांनी कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते.
अखेर जलालपूर येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय मनभावतीसोबत संगरू राम यांनी कोर्टात लग्न केले. मनभावती हिचेही हे दुसरं लग्न होते. मनभावतीला पहिल्या पतीपासून २ मुली आणि १ मुलगा आहे. संगरू राम आणि मनभावती यांनी कोर्टात लग्न करून पुन्हा प्रथा परंपरेने मंदिरातही लग्न केले. एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालून दोघांनी नव्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. तू फक्त माझं घर सांभाळ, मुलांची जबाबदारी मी घेतो असं संगरू राम यांनी मनभावती यांना सांगितले होते. लग्नानंतर दोघे घरी आले. त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांना धक्का बसला.
संगरू राम आणि मी रात्रभर बोलत होतो, आमच्या भविष्यातील स्वप्ने एकमेकांना सांगितली. परंतु सकाळी सर्वकाही बदलले. संगरू राम यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ही बातमी गावात कळताच गाव शोकाकुल झाले. वृद्धाच्या लग्नानंतर अचानक झालेल्या मृत्यूने सर्वच हैराण होते. संगरू राम यांचे २ भाचे दिल्लीत राहतात. त्यांना हे कळताच या घटनेबाबत त्यांनी संशय व्यक्त करत संगरू राम यांच्यावरील अंत्यसंस्कार जोपर्यंत ते जौनपूरला येत नाहीत तोपर्यंत थांबवण्यास सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस तपास होणार का, मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले जाणार हा चर्चेचा विषय आहे. गावकरी आणि स्थानिक प्रशासन यात चर्चा सुरू आहे. वयाचे अंतर, दुसरं लग्न आणि त्यानंतर झालेला मृत्यू यावरून अनेकांना शंका आहे. त्यामुळे या घटनेचा तपास करण्याची मागणी काही गावकऱ्यांकडून होत आहे.