गर्भवती असल्यानेच तिने केली आत्महत्या; बलात्कार करून आत्महत्येस केले प्रवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 07:52 IST2023-02-20T07:52:03+5:302023-02-20T07:52:10+5:30
सचिनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली.

गर्भवती असल्यानेच तिने केली आत्महत्या; बलात्कार करून आत्महत्येस केले प्रवृत्त
ठाणे - अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आणाभाका घेत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून गर्भवती राहील्यामुळे तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार शवविच्छेदनाच्या अहवालामुळे तसेच मोबाइलमधील संभाषणातून उघड झाल्यानंतर यातील आरोपी सचिन जयस्वार (२०) याला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
मनोरमानगर येथे एका चाळीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला. ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालयात या मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. यापूर्वीही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने त्याला चितळसर पोलिसांनी अटक केली होती. त्या प्रकरणात तो जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा तिला लग्नाचे प्रलाेभन दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सचिनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्योत्स्ना पाटील यांच्या पथकाने तिचा मोबाइल तपासला. मेसेज व कॉल संभाषणाच्या तपशिलातून सचिन या शाळकरी मित्राचे नाव समोर आले.