लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:12 IST2026-04-11T12:11:24+5:302026-04-11T12:12:08+5:30
या घटनेच्या १ महिन्यानंतर पीडित युवतीने तिच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.

लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
हैदराबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी २४ वर्षीय युवतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. एका युवकाने HIV संक्रमित इंजेक्शन युवतीला टोचल्याने तिने हे पाऊल उचलल्याचं समोर आले. मागील महिन्यात युवतीने आरोपी युवकाशी लग्न करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. याचाच राग मनात धरून आरोपी युवकाने युवतीला इंजेक्शन टोचले. या आरोपीचं नाव मनोहर असून ११ मार्च रोजी ही घटना घडली.
घरात घुसून बळजबरीने इंजेक्शन टोचले
आरोपी मनोहरने युवतीच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. माहितीनुसार, आरोपी आणि पीडित युवती हे नातेवाईक होते. युवतीच्या आई वडिलांनी सुरुवातीला आरोपी युवकासोबत मुलीचे लग्न ठरवले होते. आरोपीचे आई वडील आधीपासून HIV संक्रमित होते. युवतीच्या आई वडिलांना ही बाब कळली तेव्हा त्यांनी युवकाची HIV चाचणी केली होती. या चाचणीत आरोपी युवकालाही HIV असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर युवतीने हे लग्न मोडले. या गोष्टीतून नाराज होऊन आरोपीने युवतीला HIV इंजेक्शन टोचले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली.
दरम्यान, या घटनेच्या १ महिन्यानंतर पीडित युवतीने तिच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. युवती तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर तिला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे पीडितेच्या आई वडिलांना धक्का बसला. आरोपी युवकाने HIV संक्रमित इंजेक्शन टोचल्यापासून पीडिता मानसिक तणावाखाली होती. बदनामी आणि दहशतीपोटी तिने हे पाऊल उचलले असा आरोप तिच्या घरच्यांनी केला. या घटनेतील आरोपी युवकावर आता हत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.