विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:02 IST2025-07-10T06:02:29+5:302025-07-10T06:02:52+5:30
मुख्याध्यापिकेला अटक, मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला.

विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
शहापूर : एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि पॅड आढळल्याने संतप्त झालेल्या मुख्याध्यापिकेने पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शोधण्यासाठी अनेक विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून तपासणी केली होती. या घृणास्पद प्रकाराबद्दल पोलिसांनी बुधवारी मुख्याध्यापिकेसह चार शिक्षिका, महिला सफाई कामगार आणि दोन संस्थाचालकावर पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. तर, मुख्याध्यापिका आणि सफाई कामगार महिलेला अटकही करण्यात आली आहे.
शाळेच्या महिला सफाई कामगाराला मंगळवारी दुपारी स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि भिंतीवर रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे आढळल्याने तिने हा प्रकार मुख्याध्यापिकेच्या निदर्शनास आणला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थिनींना बोलावून कोणाला पाळी आली आहे का? असे दरडावून विचारले. मात्र अनेक विद्यार्थिनी भीतीने गप्प बसल्या. त्यावर मुख्याध्यापिकेने पुन्हा संतापून विचारताच काही विद्यार्थिनींनी घाबरून पाळी आल्याचे सांगितले. परंतु, त्यांच्यावर विश्वास न ठेवता मुख्याध्यापिकेने सफाई कामगार महिलेस सर्व विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यास सांगितले. तसेच भिंतीवरील रक्ताच्या डागाची चित्रफीतही प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दाखवली. शिवाय, काही विद्यार्थिनींच्या बोटांचे ठसेही घेतल्याचा आरोप पोलिसांत दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.
पालकांची शाळेत धाव, विचारला जाब
मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला. संस्थाचालक येईपर्यंत पालकांनी शाळेतच ठिय्या दिला. पालक मुख्याध्यापिकेविरोधात प्रचंड संताप व्यक्त करीत असतानाच पोलिस पोहोचले आणि त्यांनी तातडीने मुख्याध्यापिकेला पोलिस ठाण्यात आणले.
संतप्त पालकांचा जमाव पोलिस ठाण्यात
पोलिसांनी मुख्याध्यापिकेस पोलिस ठाण्यात नेल्यानंतर संतप्त पालकांनी आपला मोर्चा पोलिस ठाण्याकडे वळवला. जोपर्यंत संस्थाचालक शहापूरला येत नाही आणि मुख्याध्यापिकेवर कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असे म्हणत पालकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडले.
संस्थाचालकांसह चार शिक्षिकांना पोक्सो
या प्रकाराबद्दल दोन संस्थाचालक, मुख्याध्यापिका, चार शिक्षिका आणि सफाई कामगार महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपपोलिस अधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले. संस्थेना मुख्याध्यापिकेला बडतर्फ करणार असल्याची माहितीही त्यांनी पालकांना दिली.