नारायण बडगुजर
पिंपरी - सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड येथे सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हा हुंडाबळीचा प्रकार असून, सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
दिव्या हर्षल सूर्यवंशी (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. दिव्याचा भाऊ देवेंद्र भाऊसाहेब खैरनार (वय २६, रा. मोहाडी, प्र. डांगरी, ता. जि. धुळे) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) वाकड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत दिव्याच्या सासरच्यां विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये दिव्याच्या माहेरच्यांनी ४० तोळे सोने आणि सुमारे २० लाख रुपये खर्च करून थाटामाटात दिव्याचे लग्न करून दिले. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी दिव्याचा छळ सुरू केला.
तिला नोकरी न मिळणे, फर्निचरसाठी पैसे न आणणे आणि मुलबाळ न होणे यावरून सातत्याने अपमानित केले जात होते. तिला घरकामाचा अतिरिक्त ताण, मारहाण आणि मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप आहे. दिव्याचा भाऊ देवेंद्र यांनी रक्षाबंधनासाठी पुण्याला येणार असल्याचे फोन करून सांगितले. त्या कारणावरून सासरच्यांनी वाद घालत दिव्याला मारहाण केली. देवेंद्र यांचे वडील दिव्याच्या नणंदेकडे समजावण्यासाठी गेले, परंतु त्यांनी दिव्यालाच दोष दिला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
दिव्याच्या शरीरावर मारहाणीच्या ताज्या खुणा आढळल्याने तिच्या माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या मंडळींनी छळ करून दिव्याला आत्महत्येस प्रवृत्त केले असून, हा हुंडाबळीचा प्रकार आहे, असा आरोप माहेरच्यांनी केला आहे.