संतापजनक! पत्नीवर संशय घेत ३ वर्षाच्या चिमुरड्याचा बापाने गळा चिरला, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 20:14 IST2025-03-22T20:13:56+5:302025-03-22T20:14:36+5:30
शुद्ध आल्यानंतर माधवने मुलाची हत्या केल्याचं कबुल केले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी जात जंगलात मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला.

संतापजनक! पत्नीवर संशय घेत ३ वर्षाच्या चिमुरड्याचा बापाने गळा चिरला, त्यानंतर...
पुणे - शहरात एका इंजिनिअर पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ३ वर्षाच्या लहान मुलाचा गळा चिरून मृतदेह जंगलात फेकला आहे. पुण्यातील चंदन नगर भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी एका लॉजमध्ये नशेच्या अवस्थेत सापडला. मृत हिंमत माधव टिकेती हा इंजिनिअर माधव टिकेती आणि त्याची पत्नी स्वरूपा याचा एकुलता एक मुलगा होता. हे कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे राहणारे आहे.
भांडणानंतर मुलाला घरातून बाहेर काढलं होते
पोलीस माहितीनुसार, माधव याला पत्नी स्वरूपाच्या चारित्र्यावर संशय होता. गुरुवारी दुपारी दोन्ही दाम्पत्यामध्ये भांडण झाले. यात रागाच्या भरात माधवने त्याच्या ३ वर्षीय मुलाला घराबाहेर काढले. दिवसभर मुलगा बाहेर बसून राहिला. त्यानंतर दुपारी १२.३० तो बाहेर गेला. त्यानंतर एका सुपर मार्केटमध्ये जात पुन्हा चंदनगरच्या जंगलात गेला. बरेच तास उलटले तरी पतीशी संपर्क न झाल्याने पत्नीने चंदन नगर पोलीस ठाण्यात पती आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
लॉजमध्ये नशेच्या अवस्थेत सापडला पती
तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात माधव अखेरचं गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास त्याच्या मुलासह दिसून आला. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता फुटेजमध्ये माधव एकटाच कपडे खरेदी करताना दिसून आला. माधवचं फोन लोकेशन पोलिसांनी ट्रॅक करत त्याला लॉजमध्ये पकडले. त्यावेळी माधव नशेत होता. त्याला शुद्ध आल्यानंतर माधवने मुलाची हत्या केल्याचं कबुल केले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी जात जंगलात मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला.
इंजिनिअर पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
दरम्यान, रात्री मुलाची आई पोलीस स्टेशनला आली, तिने पती आणि मुलगा बेपत्ता असल्याचं सांगितले. तपासात मुलाचे वडील नशेत एका लॉजमध्ये सापडले. त्यांना ताब्यात घेतले तेव्हा मुलाच्या हत्येचा गुन्हा कबुल केला. त्यानंतर त्याला अटक केली. सध्या आरोपी पोलीस तावडीत असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.