चिकनची पार्टी जीवावर बेतली! पार्टीसाठी पैसे दिले नाही या वादातून मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:42 IST2025-01-31T13:42:24+5:302025-01-31T13:42:51+5:30
याबाबत खारघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मनू शर्माला अटक केली आहे

चिकनची पार्टी जीवावर बेतली! पार्टीसाठी पैसे दिले नाही या वादातून मित्राची हत्या
नवी मुंबई - खारघरच्या बेलपाडा आदिवासी वाडीत क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला करून जयेश वाघे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी मनू शर्माला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याचं समोर आले. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे सफाई कामगार म्हणून काम करायचा.
माहितीनुसार, २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. तेव्हा चिकन पार्टीसाठी काहीही पैसे न दिल्याच्या कारणावरून जयेश आणि मनू यांच्यात वाद झाला, शिवीगाळ करण्यात आली. हा वाद टोकाला गेला आणि जयेशने मनू याच्या कानाखाली मारली. याचा राग आल्याने मनू याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत, पोटावर मारहाण केली. मनूचा राग अनावर झाला होता. त्यातून त्याने क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर, पाठीवर हल्ला केला. यात जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनू शर्मा याला अटक केली.
दरम्यान, २३ तारखेला मृत जयेश वाघे त्याच्या मित्रांसोबत क्रिकेटच्या ग्राऊंडवर जेवण बनवण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा मित्र या घटनेतील आरोपी मनू शर्मा याच्यात कॉन्ट्रीब्यूशनचे पैसे देत नाही या कारणावरून वाद झाला. आम्ही तुला जेवायला देणार नाही अशी बाचाबाची झाली. या वादात मनू शर्माने रागाच्या भरात जयेशला बांबूने, हाताबुक्क्याने मारले. जयेश या मारहाणीत गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर २७ तारखेला त्याचा मृत्यू झाला. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मनू शर्माला अटक केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.