रिक्षाच्या नंबर प्लेटवरून लाखोंची घरफोडी उघडकीस; जेलमध्ये आखला होता प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:38 IST2025-01-17T17:37:27+5:302025-01-17T17:38:02+5:30
रिक्षाचालक योगेश गोविंद (३१) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

रिक्षाच्या नंबर प्लेटवरून लाखोंची घरफोडी उघडकीस; जेलमध्ये आखला होता प्लॅन
मंगेश कराळे
नालासोपारा - नाळा गावातील पडई येथे झालेली लाखोंची घरफोडी रिक्षाच्या नंबर प्लेटवरून उघडकीस आणण्यास नालासोपारा गुन्हे प्रकटीकरणच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या आरोपींनी जेलमध्ये असताना या गुन्ह्याचा प्लॅन आखल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोपीकडून १५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले असून फरार एक आरोपी आणि ज्वेलर्स मालकाचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.
नाळा गावातील पडई परिसरात राहणारे दिव्येश म्हात्रे (२५) यांच्या बंगल्यात ८ जुलैला दिवसाढवळ्या लाखोंची घरफोडी झाली. आरोपींनी घराचे लॉक असलेले कडी कोयंडा कश्याचे साहाय्याने तोडून बंगल्यात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातून २५ लाख ६६ हजारांचे ६२० ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. नालासोपारा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. मोठ्या प्रमाणात दागिने चोरी झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी रिक्षाने आल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्याने ८० सीसीटीव्ही तपासून तिच्या नंबर प्लेटवरून भिवंडीच्या काल्हेर गावात रिक्षा सापडली. रिक्षाचालक योगेश गोविंद (३१) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन दोन साथीदार रिझवान अन्सारी (३०) आणि मोझम शेख (२९) यांच्या मदतीने चोरी केली. ते दोघे दिल्ली येथे विक्री करण्यासाठी गेल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिल्लीतून मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून मोझमला अटक केले. पण रिझवान सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. ३ जानेवारीला दाढी व केस वाढवून कानाला मफलर गुंडाळून अस्तित्व लपवत रिक्षा चालवताना पोलिसांनी नोएडा येथून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर गुन्ह्यातील ११ लाख २५ हजारांचे १५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. रिझवानकडून पोलिसांनी अजून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. रिझवानवर रायगड, आंध्रप्रदेश, दमण याठिकाणी ६ गुन्हे दाखल आहेत. तर मोझनवर कोकणातील पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय , अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहा. पो.आयुक्त विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि योगेश मोरे, पोहवा प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे, बाबा बनसोडे, सोहेल शेख यांनी केली आहे.