मुंबई - स्पेशल पॉक्सो कोर्टाने १६ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्याच्या आरोपाखाली ४० वर्षीय महिला शिक्षिकेला जामीन दिला आहे. मागील महिन्यात मुंबईतील एका प्रतिष्ठित इंग्रजी शाळेतील शिक्षिकेला अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. विद्यार्थ्याला दारू पाजून त्याला गुंगीचे औषध दिल्याचाही तिच्यावर आरोप होता. या प्रकरणी आई वडिलांनी पोलिसांना धक्कादायक जबाब दिला. शिक्षिका मागील १ वर्षापासून मुलाला हॉटेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन संबंध बनवण्यास मजबूर करत होती असं त्यांनी आरोप केला आहे.
या शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर लेडी टीचरच्या वकिलांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. स्पेशल कोर्टाचे न्या. सबीना मलिक यांनी मंगळवारी जामीन याचिका स्वीकारली. सुनावणीवेळी टीचरच्या वकिलांनी मुलाच्या आईच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल केल्याचं म्हटले. मुलाच्या आईने या नात्याला विरोध केला होता. मुलाच्या आई वडिलांना शिक्षिका आणि मुलाच्या संबंधांबाबत माहिती होते. तरीही जाणुनबुजून एफआयआरमध्ये मुलाची वागणूक आणि शिक्षिकेबद्दल त्याच्या भावना या लपवण्यात आल्या असा युक्तिवाद आरोपी शिक्षिकेच्या वकिलांनी केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिका डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक समारंभात १६ वर्षीय मुलाकडे आकर्षित झाली. त्यानंतर एका महिला मैत्रिणीच्या मदतीने तिने मुलावर नाते बनवण्यासाठी ब्रेन वॉश केले. जानेवारी २०२४ मध्ये शिक्षिकेने पहिल्यांदा मुलासोबत लैंगिक संबध ठेवले. लेडी टीचर कायम त्याला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जात होती. जिथे दारू पाजून त्याचे शोषण करत होती. जेव्हा मुलगा शाळेतून पासआऊट झाला तेव्हा टीचरने त्याला पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलाच्या आई वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली.
या अटींवर मिळाला जामीन
मंगळवारी या प्रकरणाची स्पेशल पॉक्सो कोर्टात सुनावणी झाली तेव्हा लेडी टीचरला अटींसह जामीन मंजूर करण्यात आला. या महिला टीचरला मुंबईतून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय तिने भविष्यात मुलाशी संपर्क करू नये असं कोर्टाने निर्देश दिलेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही साक्षीदारावर दबाव टाकण्यास बंदी आहे. प्रत्येक तारखेला कोर्टासमोर हजर राहावे लागेल. यातील कुठल्याही अटींचा भंग झाल्यास तात्काळ जामीन रद्द केला जाईल असं कोर्टाने म्हटले आहे.